कोल्हापूर : मराठवाडा आणि विदर्भाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल, तर नव्या शक्तीपीठ महामार्गाऐवजी विद्यमान रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा किंवा आठ पदरीकरण करावे, अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली आहे. शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा नव्हे, तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विनाशाचा मार्ग ठरेल, असा घणाघात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. राजू शेट्टी म्हणाले की, रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्ग आधीच अस्तित्वात असताना त्याच्या समांतर शक्तीपीठ महामार्ग उभारणे म्हणजे राज्यावर अनावश्यक आर्थिक बोजा टाकण्यासारखे आहे. हा महामार्ग पुढील 90 वर्षे जनतेवर टोलचा भुर्दंड लादणारा ठरेल आणि महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत ढकलेल, असा आरोप त्यांनी केला. शक्तीपीठ महामार्गाच्या खर्चावरही शेट्टी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाशिक–अक्कलकोट 374 किमी ग्रीनफिल्ड महामार्गासाठी केंद्राने 19,142 कोटी रुपये मंजूर केले असून प्रतिकिलोमीटर खर्च सुमारे 51 कोटी रुपये आहे. मात्र 803 किमी लांबीच्या शक्तीपीठ महामार्गासाठी सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा प्रस्ताव असून प्रतिकिलोमीटर खर्च 124 कोटी रुपयांहून अधिक कसा असू शकेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुपीक होणार उद्ध्वस्त या प्रकल्पामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हे पुराच्या वेढ्यात अडकतील, 12 जिल्ह्यांतील सुपीक बागायती शेती उद्ध्वस्त होईल आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल, असा इशाराही त्यांनी दिला. देवदेवतांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून हा महामार्ग पुढे रेटला जात असल्याचा आरोप करत, समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका आधी जाहीर करावी आणि त्यानंतरच शक्तीपीठ महामार्गावर चर्चा व्हावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.