Indapur News: “पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही!”; तहसीलदारांवर गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Indapur News: इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; भाजप जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

Indapur News – इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना त्वरित निलंबित करावे, तसेच त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी लेखी मागणी भाजपचे पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथे त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिले.
इंदापूर तहसील कार्यालयात आर्थिक देवाणघेवाणीशिवाय कामे केली जात नसल्याने तालुक्यातील शेतकरी व नागरिक अत्यंत त्रस्त असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतरस्त्यांच्या प्रकरणांमध्ये पैसे घेऊन निर्णय दिले जातात, तर पैसे न देणाऱ्या शेतकऱ्यांची प्रकरणे गेल्या १ ते २ वर्षांपासून प्रलंबित ठेवली जात असल्याचा थेट आरोप कांबळे यांनी केला आहे.
तसेच वाळू उपसा, जमिनीचे वाद आणि महसूल विभागातील विविध कामांमधील गैरव्यवहारांचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना व नागरिकांना दमदाटी आणि शिवीगाळ केली जात असून, याचे काही व्हिडिओ पुरावे म्हणून प्राप्त झाल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकरणांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तहसीलदार बनसोडे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वसुली आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप
तालुक्यातील खडी क्रशर चालकांकडून आर्थिक व्यवहार करून त्यांना पाठीशी घालण्याचे काम तहसीलदारांकडून वारंवार केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुरूम व खडी खोदकामाच्या पंचनाम्यांमध्ये मोठी तफावत आढळत असून, तहसील कार्यालयात बेकायदेशीर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत आर्थिक वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.





