Pimpalwandi Case: पिंपळवंडीप्रकरणी आरोपीला फाशीची मागणी; महिलांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
Pimpalwandi Case: गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास आणि न्यायालयीन सुनावणी फास्ट ट्रॅकवर करण्याची महिला पदाधिकाऱ्यांची पोलीस व न्याय यंत्रणेकडे मागणी.

Pimpalwandi Case – पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील साडेनऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची अमानुष हत्या केल्याच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कलमांनुसार कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जुन्नर नगरपरिषदेच्या नगरसेविका अंजली अरुण शिंदे, सुवर्णा श्रीकांत जाधव व राजश्री खोंड यांनी निवेदनाद्वारे केली.
या घटनेच्या निषेधार्थ जुन्नर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात उज्वला शेवाळे, सलमा सय्यद, परविन मोमीन, ज्योती पराड, वैशाली गायकवाड, छाया जोशी, कविता छाजेड, रोहिणी नवले, मनिषा काळे, ज्योत्स्ना देशपांडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. यावेळी संबंधित पोलीस व न्याय यंत्रणेकडे निवेदन साद करण्यात आले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास जलदगतीने पूर्ण करावा, तसेच न्यायालयीन सुनावणीही जलदगतीने करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणे ही अत्यंत गंभीर व अमानुष घटना आहे.
अशा घटनांना आळा बसण्यासाठी आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषी व्यक्तीवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही महिला पदाधिकार्यांनी सांगितले.




