Indapur News : शहा ग्लोबल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

इंदापूर : शहा ग्लोबल स्कूलमध्ये शनिवार (दि. २१ जून) आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि सक्रियतेने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात योग दिनाचे महत्त्व विशद करत करण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका विद्या कराडे यांनी योगाच्या गरजेबद्दल व त्याच्या लाभांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘योग हा केवळ व्यायाम नसून, स्वतःशी, निसर्गाशी आणि समाजाशी एकरूपता साधण्याचा मार्ग आहे’.
यानंतर सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली. विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. विशेषतः इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मीरा व आरुषी यांनी सूर्यनमस्कार सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
संस्थेचे मुख्य विश्वस्त अंगद शहा व रुचिरा अंगद शहा यांनी योगशिक्षक विद्यार्थी यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचा समारोप संस्कृत श्लोकांच्या पठणाने करण्यात आला. एकंदरीत कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि योगासना विषयीची जाणीव अधिक दृढ झाली.





