Indapur News: इंदापुरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह! नगराध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण
Indapur News: श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथ संचलनाने वेधले लक्ष; देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमला नगरपरिषद परिसर.

Indapur News – स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीच्या स्मृतींना उजाळा देत इंदापूर नगरपरिषद प्रांगणात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीताचे गायन केले. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गीताने झाली.
यावेळी नगराध्यक्ष भरत शहा यांनी स्वातंत्र्यलढ्यात इंदापूरमधील नागरिकांनी बजावलेल्या योगदानाचा उल्लेख करत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. इंदापूरमधील अनेक नागरिकांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या त्याग, संघर्ष आणि योगदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे आवाहन नगराध्यक्ष शहा यांनी केले.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदीप गारटकर, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, उपनगराध्यक्ष शैलेश पवार, गटनेते शकील सय्यद, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते अनिल पवार, नगरसेवक शुभम पवार, सागर अरगडे, उमेश मखरे, नगरसेविका वंदना शिंदे, अनिता ढावरे, मयुरी प्रशांत उंबरे, रजिया शेख, दिप्ती राऊत, सुनीता नलवडे, शितल शेटे, नगरसेवक गणेश राऊत, सुधाकर ढगे, पोपट शिंदे, अक्षय गानबोटे आदी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
यांच्यासह इंदापूर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर शिस्तबद्ध पथसंचलन सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. विद्यार्थ्यांच्या अनुशासनबद्ध संचलनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. देशभक्तीपर घोषणांनी नगरपरिषद परिसर दुमदुमून गेला.





