Baramati News: बारामती नगरपरिषदेचा डंका! ‘या’ महत्त्वाच्या योजनेत मारली बाजी; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण
Baramati News: केंद्र व राज्य शासनाचा निधी वेळेवर वितरित; बारामती नगरपरिषदेच्या नियोजनबद्ध कामगिरीचे सर्वत्र कौतुक.

Baramati News – ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०ची बारामती नगरपरिषद हद्दीत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत ३९५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. पुणे विभागातील नगरपरिषदांच्या तुलनेत बारामती नगरपरिषदेच्या सर्वाधिक घरकुलांना मंजुरी मिळाली असून,
यामुळे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०च्या अंमलबजावणीत बारामती नगरपरिषद पुणे विभागात अव्वल ठरली आहे. गृहनिर्माण विभागाच्या शासन निर्णय क्र. प्रआयो.२०२४/प्र.क्र.८७/गृनीधो-२, दि. १५ ऑक्टोबर २०२४नुसार या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. बारामती नगरपरिषदेकडून योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी आवश्यक त्या टप्प्यांनुसार अनुदान वितरित करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत प्रत्येक घरकुलासाठी २.५० लाखांचे अनुदान अनुज्ञेय असून, त्यामध्ये केंद्र शासनाचा १.५० लाख आणि राज्य शासनाचा रु. १.०० लाख हिस्सा आहे. प्रत्यक्ष बांधकाम सुरू असलेल्या मंजूर घरकुलांपैकी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण रु. ३८८ लाखांचे अनुदान ऑनलाइन स्नॅप पोर्टलद्वारे वितरित करण्यात आले आहे.
यामध्ये पहिल्या हप्त्यापोटी २०८ लाभार्थ्यांना, तर दुसऱ्या हप्त्यापोटी १८० लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लाख याप्रमाणे अनुदान देण्यात आले आहे. या प्रत्येक हप्त्यामध्ये केंद्र शासनाचा ६० हजार आणि राज्य शासनाचा ४० हजारांचा हिस्सा आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी २८ घरकुलांचा प्रस्ताव दि. २८ जुलै २०२६ रोजी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर बारामती नगरपरिषदेकडून रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत सन २०२५-२६ करिता २४ लाभार्थी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १२ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यापोटी प्रत्येकी १ लाख रुपया याप्रमाणे १२ लाख, तर ६ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी प्रत्येकी १ लाख याप्रमाणे ६ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
बारामती शहरातील प्रत्येक गरजू नागरिकाला स्वतःचे पक्के घर मिळावे आणि बारामती शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे, हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी बारामती नगरपरिषदेकडून घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
“बारामती शहरातील प्रत्येक गरजू कुटुंबाला स्वतःचे पक्के घर मिळावे आणि शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे, हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारामती नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून गतीने कार्यवाही केली जात आहे. पुणे विभागात बारामती नगरपरिषद अव्वल ठरली असून, ही कामगिरी नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्हाला प्रेरणा देणारी आहे.”
– सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद.
“प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड, प्रस्ताव सादरीकरण, मंजुरी आणि अनुदान वितरणाची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. मंजूर घरकुलांचे बांधकाम प्रत्यक्ष सुरू होऊन लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळावे, यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.”
– पंकज भुसे, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद.






