Indapur Gol Ringan: इंदापूरमध्ये तुकोबारायांचे अभूतपूर्व गोल रिंगण; मानाच्या अश्वांच्या धावण्याने लाखो डोळ्यांचे पारणे फिटले
Indapur Gol Ringan: निमगाव केतकी येथील मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापुरात आगमन; रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात रंगला भक्तीचा सोहळा.

Indapur Gol Ringan: संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की, विठ्ठलनामाच्या अनुभूतीने शरीर-मनातील सर्व ताप शांत होतात. विठ्ठलाचे दर्शन म्हणजे संपूर्ण विश्वाचे दर्शन होय. इंदापूरच्या गोल रिंगणात याच अभंगाचा प्रत्यय प्रत्येक वारकरी आणि भाविकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. इंदापूरच्या पवित्र भूमीवर शनिवारी (दि. 18) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे मानाचे गोल रिंगण लाखो वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या साक्षीने अभूतपूर्व भक्तिभावात पार पडले.
लाल मातीत धावणाऱ्या मानाच्या अश्वांच्या टापांचा निनाद, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड गजरात दुमदुमलेले आसमंत, टाळ-मृदुंगाचा एकसंध नाद, पताकांची उंच भरारी आणि हरिनामात रंगलेला वारकरी समाज… या सर्वांनी इंदापूर नगरीला वैकुंठाचा साक्षात्कार घडविला. रयत शिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण प्रांगणात नगरपरिषदेने शिस्तबद्ध उभारलेल्या गोल रिंगण स्थळी मानाच्या अश्वाने क्षणाचाही विलंब न लावता प्रदक्षिणा पूर्ण केली आणि लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
निमगाव केतकी येथील मुक्कामानंतर पालखी सोहळा इंदापूरमध्ये सकाळी ११. २२ वाजता दाखल झाला. रिंगणस्थळी सकाळी ११.५४ वाजता पालखीचे आगमन होताच मानाचा नगारा दुमदुमला. बाल वारकऱ्यांनी पखवाजावर छेडलेला ताल आणि टाळ-चिपळ्यांचा लयबद्ध संगम यामुळे वातावरण अधिकच भारावून गेले. डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी,
मानाचे विणेकरी, पताकाधारी आणि दिंडीतील वारकरी यांनी प्रदक्षिणा पूर्ण करत भक्तीचा उत्सव अधिकच रंगविला. त्यानंतर मानाच्या अश्वांची विधिवत पूजा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर अश्व रिंगणात दाखल होताच उपस्थित भाविकांनी “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”चा गजर करत आसमंत दणाणून सोडला.
या रिंगण सोहळ्याला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सारिकाताई भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, भाजप नेते प्रदीप गारटकर, निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील -ठाकरे, युवक नेते राजवर्धन पाटील यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि हजारो वारकरी या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
वृद्ध आणि महिलांसाठी प्रथमच विशेष स्टेडियम
नगराध्यक्ष भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच विशेष प्रेक्षक स्टेडियम उभारण्यात आले. वृद्ध वारकरी, महिला आणि दिव्यांग भाविकांना बसून रिंगण सोहळा पाहता यावा, यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक झाले. उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, गटनेते शकील सय्यद, विरोधी पक्षनेते अनिल पवार, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, मुख्याधिकारी रमेश ढगे आणि नगरपरिषदेच्या संपूर्ण प्रशासनाने नियोजन यशस्वी केले.
पावसाच्या शिडकाव्याने तुकोबारायांचे स्वागत
इंदापूरच्या गोल रिंगणाची एक अनोखी परंपरा यंदाही कायम राहिली. रिंगण सोहळा सुरू असतानाच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. वारकरी आणि भाविकांनी त्याकडे विठ्ठलाच्या कृपावर्षावाप्रमाणे पाहिले. या शिडकाव्यामुळे वातावरणात सुखद गारवा पसरला आणि हरिनामाचा उत्साह आणखी द्विगुणित झाला.






