IND W vs SA W Final : अमनजोत कौरच्या अचूक थ्रोने फिरला सामना! ब्रिट्सच्या रनआऊटने भारताचे कमबॅक, पाहा VIDEO

Amanjot Kaur Direct Throw Video Viral : नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये आयसीसी महिला वनडे विश्व कप २०२५ चा अंतिम सामना सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला दमदार सुरुवात मिळाली होती. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जोरावर सामन्यात दमदार पुनरागमन केले आहे. ज्यापैकी अमनजोत कौरच्या शानदार थ्रोचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अमनजोत कौरचा शानदार थ्रो, भारताला मिळाली पहिली विकेट
दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी ९ षटकांत बिनबाद ५१ धावांची भागीदारी करत भारताला चिंतेत टाकले होते. यावेळी टीम इंडियाला एका विकेटची नितांत गरज होती. ही महत्त्वपूर्ण विकेट भारताला अमनजोत कौरच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणातून मिळाली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A quick pick-up and a 🎯
Elation all around as #AmanjotKaur’s direct-hit provides the breakthrough Team India needed! #TanzimBritts makes her way back! 💥#CWC25 Final 👉 #INDvSA, LIVE NOW 👉 https://t.co/gGh9yFhTix pic.twitter.com/EP9eYuZ2zi
— Star Sports (@StarSportsIndia) November 2, 2025
दक्षिण आफ्रिकेच्या डावाती १० व्या षटकात, रेणुका सिंह ठाकूरच्या तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर तैजमिन ब्रिट्सने मिड-विकेटच्या दिशेने शॉट मारून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. मिड-विकेटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या अमनजोत कौरने क्षणाचाही विलंब न लावता चेंडूवर झेप घेतली. तिने वेगाने चेंडू उचलून नॉन-स्ट्रायकर एंडवर असा अचूक थ्रो केला की, चेंडू थेट स्टंप्सला लागला. या अप्रतिम रनआउटमुळे ब्रिट्सला २३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. ब्रिट्सच्या रूपाने भारताला सामन्यातील पहिली आणि महत्त्वाची विकेट मिळाली.
द. आफ्रिकेची पडझड: ब्रिट्स आणि बॉश लवकर बाद
३५ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २३ धावा करून ब्रिट्स बाद झाली. तिच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली एनेक बॉश लगेचच माघारी परतली. श्री चरनीने तिला ६ चेंडूंमध्ये शून्य (डक) धावांवर पायचीत (LBW) करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या विकेट्समुळे सामन्यावर भारताची पकड मजबूत झाली आहे. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी अजूनही २०० हून अधिक धावांची आवश्यकता आहे आणि उर्वरित फलंदाज हे लक्ष्य कसे गाठतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – IND W vs SA W Final : अंपायरने दीप्ता शर्माला चुकीने आऊट देताच संतापला रोहित शर्मा, पाहा VIDEO
भारताची फलंदाजी: शफाली-दीप्तीची अर्धशतके
या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. निर्धारित ५० षटकांत भारतीय संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात २९८ धावा केल्या. भारताच्या दोन फलंदाजांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर शैफाली वर्माने ७८ चेंडूंमध्ये ८७ धावांची आक्रमक खेळी साकारली. तिच्या पाठोपाठ दीप्ती शर्माने ५८ चेंडूंमध्ये ५८ धावांचे योगदान दिले. अखेरीस यष्टिरक्षक-फलंदाज ऋचा घोषने २४ चेंडूंमध्ये ३४ धावांची तडफदार खेळी करून भारताची धावसंख्या २९८ पर्यंत पोहोचवली.





