IND W vs SA W 2nd T20 : ब्रिट्सचे सलग दुसरे अर्धशतक,द. आफ्रिकेचे भारतासमोर 178 धावांचे लक्ष्य..

IND W vs SA W 2nd T20 Score Update : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यात आज तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 12 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या सामन्यात टीम इंडिया मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरली आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागलेल्या संघात भारताने एक बदल केला आणि रिचा घोषच्या जागी उमा छेत्रीला पदार्पणाची संधी दिली. दक्षिण आफ्रिकेने आपल्या विजयी संघात कोणताही बदल केला नाही. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावसंख्येपर्यत मजल मारली. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 178 धावा करायच्या आहेत.
Innings Break!
South Africa post 177/6 in the first innings.
2⃣ wickets each for Deepti Sharma & Pooja Vastrakar 👏
A wicket each for Radha Yadav and Shreyanka Patil 👌
Scorecard ▶️ https://t.co/wykEMCz3xT#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/EYWZ4S06ke
— BCCI Women (@BCCIWomen) July 7, 2024
दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर तझमिन ब्रिट्सने 39 चेंडूत 6 चौकार अन् 1 षटकारासह 52 धावांची शानदार खेळी केली. तिचे या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक आहे. याव्यतिरिक्त एनेके बॉश हिने 32 चेंडूत 40, कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट 12 चेंडूत 22 आणि मारिजान कप्प हिने 14 चेंडूत 20 धावांची खेळी केली. तर क्लो ट्रायोन (12) नादिन डी क्लार्क (14) या लवकर बाद झाल्या. तर एनेरी डर्कसेन 3 चेंडूत नाबाद 12 तर एलिज़-मारी मार्क्स 1 धावेवर नाबाद राहिली.
टीम इंडियासाठी पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पूजाने 4 षटकात 37 तर दीप्तीने 4 षटकात 20 धावा दिल्या. याव्यतिरिक्त श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.





