IND W vs SA W Final : फायनलमध्ये पाहायला मिळणार बॉलीवूडचा तडका! सुनिधी चौहान लाईव्ह परफॉर्मन्सने करणार मंत्रमुग्ध

IND W vs SA W Final Sunidhi Chauhan Live Performance : आयसीसी महिला वनडे विश्व कप २०२५ चा अत्यंत महत्त्वाचा आणि रोमांचक अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील डी.वाई. पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्यात यजमान भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. हा केवळ क्रिकेटचा सामना नसून, या सोहळ्याला बॉलिवूडच्या ग्लॅमरची जोड मिळणार आहे.
सुनिधी चौहानच्या परफॉर्मन्सने वाढणार उत्साह –
या अंतिम सामन्याचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खास मनोरंजनाच्या कार्यक्रमांची योजना आखली आहे. बॉलिवूडची लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान या महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या ऊर्जावान आणि लोकप्रिय गाण्यांवर लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहे. तिच्या जबरदस्त परफॉर्मन्सने स्टेडियममधील वातावरण जोशपूर्ण होईल, यात शंका नाही.
One of India’s singing greats, Sunidhi Chauhan will light up the #CWC25 Final 🔥https://t.co/QoaTgb5WLT
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 1, 2025
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, “सुनिधी चौहान अंतिम सामन्यात परफॉर्मन्स करणार आहे. तिच्यासोबत ६० नर्तकांचा समूह असेल आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक संजय शेट्टी यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.” याशिवाय, लेझर शो आणि ड्रोन प्रदर्शन देखील आयोजित केले जाणार आहे, ज्यामुळे क्रिकेट आणि संगीताचा हा संगम अविस्मरणीय ठरेल.
राष्ट्रगीत गायन आणि सुनिधीचा उत्साह –
सामन्यापूर्वी, सुनिधी चौहान भारतीय राष्ट्रगीत गाणार आहे, तर केप टाऊनची टॅरिन बँक दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रगीत सादर करेल. याबद्दल सुनिधी चौहानने आपला आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली, “महिला विश्व कपच्या अंतिम सामन्यात परफॉर्मन्स करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि मी या खास दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अंतिम सामन्यात भारत असल्याने आणि उत्साही चाहत्यांनी भरलेल्या स्टँड्समुळे, मला खात्री आहे की वातावरण उत्साहाने भरलेले असेल आणि हा एक दीर्घकाळ स्मरणात राहणारा दिवस असेल.”
अंतिम सामन्यात भारताची तिसऱ्यांदा एन्ट्री –
क्रिकेटच्या मैदानावरील लढतीबद्दल बोलायचं झाल्यास, भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जेमिमा रॉड्रिग्सच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने ३३९ धावांचे विक्रमी लक्ष्य गाठून अंतिम फेरी गाठली. यापूर्वी, भारतीय संघाने २००५ आणि २०१७ मध्ये अंतिम सामने खेळले आहेत, परंतु दोन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच फायनलमध्ये दाखल
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडला हरवून पहिल्यांदाच आयसीसी महिला वनडे विश्व कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यामुळे, यंदाचा विश्व कप असा संघ जिंकेल, ज्याने पूर्वी कधीही ही ट्रॉफी जिंकलेली नाही. आयसीसीने शनिवारी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर दोन्ही कर्णधारांचा ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





