Women’s T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने भारताविरूध्द Toss जिंकला, कर्णधार सोफीनं घेतला ‘हा’ निर्णय…

Women’s T20 World Cup 2024 (IND-W vs NZ-W Toss Update) : आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड महिला संघ आज आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिला सामना असणार आहे. अशा स्थितीत दोन्ही संघ विजयाने सुरुवात करतील. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले असून थोड्याच वेळात सामन्यास सुरूवात होणार आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला आहे. या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका व न्यूझीलंड या संघाचा समावेश आहे. आजच्या लढतीमध्ये स्मृती मंधाना, शेफाली वर्मा व कर्णधार हरामनप्रीत कौर यांच्यावर भारतीय फलंदाजीची मदार असणार आहे. भारताच्या अनुभवी खेळाडू कर्णधार हरामनप्रीत कौर, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा व दीप्ती शर्मा यांच्याकडून भारताला मोठ्या आशा आहेत. भारतीय महिला संघाला कधीही विश्वचषक विजेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळीही आव्हान सोपे नसेल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल(Toss update) हा न्यूझीलंड संघाच्या बाजूनं लागला आहे. न्यूझीलंड संघाची कर्णधार सोफी डेव्हाईन हिनं फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (New Zealand win the toss and elect to bat) त्यामुळे टीम इंडिया प्रथम गोंलदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
गोलंदाजीच्या बाबतीत रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर आणि अरुंधती रेड्डी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे. भारताकडे सध्याच्या घडीला ऑफस्पिनर दीप्ती आणि श्रेयांका पाटील, लेग स्पिनर आशा शोभना व डावखुऱ्या राधा यादवचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ दोन किंवा तीन खेळाडूंना संधी मिळू शकेल.
भारताच्या बरोबरीने न्यूझीलंडच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार सोफी डेव्हाईन, अनुभवी अष्टपैलू सुझी बेट्स, ली ताहुहू आणि लेह कॅस्परेक हे खेळाडू न्यूझीलंडसाठी महत्वाची भूमिका बजावतील.
सामन्याचे थेट प्रक्षेपण ….
तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा T20 विश्वचषक 2024 सामना पाहू शकता. सामन्याचे लाइव स्ट्रीमिंग Disney + Hotstar वर उपलब्ध असेल. तुम्ही Disney + Hotstar वर हा सामना विनामूल्य पाहू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही.
दोन्ही सराव सामन्यात भारतानं मारली बाजी…
विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतीय महिला संघाने दोन सराव सामने खेळले. जिथे टीम इंडियाने दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. टीम इंडियाने 2016 च्या चॅम्पियन टीम वेस्ट इंडिजचा पहिल्या सराव सामन्यात पराभव केला. यानंतर टीम इंडियाने पुढच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 28 धावांनी पराभव केला.





