IND W vs NZ W : प्रतिका रावलने केली विश्वविक्रमाची बरोबरी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय

Pratika Rawal Equals World Record : महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये भारतीय संघ आपला प्रवास यशस्वीपणे पुढे नेत आहे. याच दरम्यान, भारताची सलामीवीर फलंदाज प्रतिका रावलने एका नव्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे. यापूर्वी केवळ ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे वर्चस्व असलेल्या यादीत आता प्रतिका रावलने आपले नाव नोंदवले आहे. नवी मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात तिने हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
प्रतिका रावलने वनडेत पूर्ण केले 1000 धावा –
गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या महिला वनडे विश्वचषक सामन्यासाठी मैदानात उतरताना प्रतिका रावलने 22 वनडे सामने खेळत 988 धावा केल्या होत्या. त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्या 1000 धावांच्या टप्प्याकडे लागल्या होत्या. प्रतिकाने अपेक्षेप्रमाणे 23व्या सामन्यातच हा टप्पा गाठत 1000 वनडे धावा पूर्ण केल्या. हा एक विश्वविक्रमाशी बरोबरी साधणारा क्षण आहे. महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ दोनच फलंदाजांनी इतक्या कमी सामन्यांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या लिंडसे रीलरशी केली बरोबरी –
Pratika Rawal storms to 1️⃣0️⃣0️⃣0️⃣ ODI runs in only 23 innings — the joint-fastest ever to reach the milestone! 💙🔥#INDvNZ #PratikaRawal #CWC25 #Sportskeeda pic.twitter.com/oQrAJm41wR
— Sportskeeda (@Sportskeeda) October 23, 2025
प्रतिका रावलने ऑस्ट्रेलियाच्या लिंडसे रीलरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रीलरनेही 23 वनडे डावांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. याशिवाय, ऑस्ट्रेलियाच्या निकोल बोल्टन आणि मेग लॅनिंग यांनी अनुक्रमे 25 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. मात्र, प्रतिका आता या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. तिने आपल्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत एक शतक आणि सात अर्धशतके झळकावली आहेत. आक्रमक फलंदाजी आणि मोठी खेळी करण्याच्या क्षमतेमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
हेही वाचा – IND vs AUS : रोहित-अय्यर यांच्यात मैदानावरच जुंपली! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
मिताली राजचा मोडला विक्रम –
भारतीय क्रिकेटसाठीही प्रतिकाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी भारताकडून सर्वात कमी डावांमध्ये 1000 धावा करण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर होता. मितालीने 29 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता, पण आता प्रतिकाने हा विक्रम मोडत केवळ 23 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा – Pakistan Cricket Team : बाबर आझम, नसीम शाह यांचे टी-20 संघात दमदार पुनरागमन!
आता सर्वांचे लक्ष प्रतिकाच्या मोठ्या खेळीवर लागले आहे. आतापर्यंत ती 71 चेंडूत 47 धावांवर नाबाद आहे. विश्वचषकातील पुढील टप्पे आणि आव्हाने अधिक कठीण असणार आहेत. प्रतिका आपल्या आक्रमक शैलीने आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने भारतीय संघाला यश मिळवून देण्यासाठी कशी योगदान देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





