IND vs ZIM 3rd T20 : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय; झिम्बाब्वेचा 23 धावांनी केला पराभव…

India vs Zimbabwe 3rd T20 Match Result : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात झिम्बाब्वे संघ काही विशेष कामगिरी करू शकला नाही. सिकंदर रझा संघ पुन्हा एकदा बॉल आणि बॅटने फ्लॉप ठरला.
यजमान झिम्बाब्वेसमोर 183 धावांचे मोठे लक्ष्य होते, मात्र संघाची सुरुवातच इतकी खराब झाली होती की, 39 धावसंख्येवरच अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये असलेला वेस्ली मधवेरे केवळ 1 धावा काढून बाद झाला. कर्णधार सिकंदर रझा पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याला चांगली सुरुवात मिळाली पण सामन्याची दिशा बदलू शकेल अशी खेळी त्याला खेळता आली नाही. रझा 16 चेंडूत 15 धावा करून बाद झाला.
एकेकाळी झिम्बाब्वेने 39 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या, पण इथून क्लाइव मडांडे आणि डिऑन मायर्स यांनी मिळून जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या दोघांनी विशेषतः अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांना लक्ष्य केले. या दोघांनी मिळून 7 षटकांत 5 बाद 39 अशी असलेली धावसंख्या 15 षटकांत तितक्याच विकेट्सवर 110 धावसंख्येवर नेली. पण यानंतर झिम्बाब्वेचे फलंदाज डेथ ओव्हर्समध्ये पुन्हा अपयशी ठरले. मडांडेने 26 चेंडूत 37 धावा केल्या आणि मायर्सने त्याच्या T20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. मायर्स 49 चेंडूत 65 धावा केल्यानंतर नाबाद माघारी परतला, पण संघाचा विजय निश्चित करू शकला नाही. मडांडे आणि डिऑन मायर्स या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी झाली, जी सुंदरने मोडली. त्यांनी मडांडे याला बाद केले. वेलिंग्टन मसाकादझा 10 चेंडूत 18 धावा काढून नाबाद राहिला.
For his economical spell of 3/15 in the second innings, Washington Sundar receives the Player of the Match award 🏆👏
Scorecard ▶️ https://t.co/FiBMpdYQbc#TeamIndia | #ZIMvIND | @Sundarwashi5 pic.twitter.com/j8jBHdz66C
— BCCI (@BCCI) July 10, 2024
खलील अहमदने दिली सामन्याला कलाटणी..
झिम्बाब्वेला विजयासाठी शेवटच्या 5 षटकात 73 धावा करायच्या होत्या. मायर्स आणि मडांडे ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, त्यामुळे हे लक्ष्य सहज गाठता आले असते. पण 16व्या षटकात खलील अहमदने केवळ 2 धावा दिल्या, त्यामुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दबाव निर्माण झाला. उर्वरित काम आवेश खानने 18 व्या षटकात पूर्ण केले, ज्याने या षटकात केवळ 6 धावा दिल्या, त्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला. वॉशिंग्टन सुंदरने भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या, ज्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 15 धावा देताना 3 बळी घेतले. आवेश खानने 2 तर खलील अहमदने 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 4 गडी गमावून 182 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली जी नवव्या षटकात सिकंदर रझाने तोडली. त्याने जैस्वालला बेनेटकरवी झेलबाद केले. तो 27 चेंडूत 36 धावा करू शकला. या दरम्यान युवा फलंदाजाने 133.33 च्या स्ट्राईक रेटने चार चौकार आणि दोन षटकार मारले. यानंतर अभिषेक शर्मा आला. मात्र, त्याला मागील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. अवघ्या 10 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
Wimbledon Open 2024 : सामना ‘न’ खेळताच नोव्हाक जोकोविचची थेट उपांत्य फेरीत धडक, जाणून घ्या कारण…
यानंतर ऋतुराज गायकवाड याने पदभार स्वीकारला. त्याने शुभमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. 18व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मुझाराबानीने भारताला तिसरा धक्का दिला. त्याने कर्णधाराला बाद केले. गिलने या सामन्यात आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याने 49 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि तीन षटकार आले. तर ऋतुराज गायकवाडने 49 धावांची तुफानी खेळी केली. मात्र, त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. 28 चेंडूंचा सामना करताना त्याने चार चौकार आणि तीन षटकार मारले. भारताकडून संजू सॅमसन 12 तर रिंकू सिंग एका धावेवर नाबाद राहिला.
झिम्बाब्वेच्या खेळाडूंचे क्षेत्ररक्षण अतिशय खराब झाले, त्यामुळे संघाने किमान 10-15 अतिरिक्त धावा दिल्या आणि बरेच झेलही सोडले. यजमान संघाकडून कर्णधार सिकंदर रझा याने दोन आणि ब्लेसिंग मुजरबानीनं एक बळी घेतला.





