Shafali Verma Reprimand : आयसीसीची शफाली वर्मावर मोठी कारवाई! दुसऱ्या सामन्यातील ‘ती’ चूक पडली महागात
Shafali Verma Reprimand : झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेटपटू शफाली वर्माला अधिकृत इशारा देण्यात आला आहे.

Shafali Verma Reprimanded by ICC for Code of Conduct Breach in Second T20I Against Zimbabwe : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा हिला झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अधिकृत ताकीद देण्यात आली आहे. यासोबतच तिच्या शिस्तभंगाच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंटही जोडण्यात आला आहे. १८ ऑक्टोबर रोजी रायपूरच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली होती. आयसीसीच्या माहितीनुसार, शफालीने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या नियमावलीतील लेव्हल-१ चे उल्लंघन केले असून, क्रिकेटचे साहित्य, कपडे किंवा मैदानावरील साहित्याचा गैरवापर करण्याशी संबंधित असलेल्या कलम २.२ अंतर्गत तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
झेल सुटल्यानंतर संताप; रागाच्या भरात जमिनीवर आपटला चेंडू –
ही घटना भारतीय गोलंदाजीदरम्यान पहिल्या डावातील १२ व्या षटकात घडली. श्री चरणीच्या चेंडूवर मिड-ऑफवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या शफाली वर्माकडून चिपो मुगेरी-तिरिपानोचा सोपा झेल सुटला. स्वतःच्या या चुकीमुळे प्रचंड निराश झालेल्या शफालीने संतापाच्या भरात हातातील चेंडू जोरात जमिनीवर फेकून आपटला. तिचे हे वर्तन आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग करणारे मानले गेले. सामन्यानंतर शफालीने आपली चूक त्वरित मान्य केली आणि आयसीसी मॅच रेफ्री पॅनेलच्या जीएस लक्ष्मी यांनी सुनावलेली शिक्षा स्वीकारल्यामुळे या प्रकरणाची कोणतीही औपचारिक सुनावणी घेण्याची गरज पडली नाही. गेल्या २४ महिन्यांच्या कालावधीतील शफालीचे हे पहिलेच उल्लंघन ठरले आहे.
डिमेरिट पॉईंट वाढल्यास बंदीची टांगती तलवार –
Shafali Gets Official Warning After Angry Throw!
India’s T20I vice-captain Shafali Verma was reprimanded and given one demerit point for throwing the ball in frustration after dropping a catch in the second T20I against Zimbabwe. She admitted the offence. https://t.co/NtSt3zE8HL
— Cricket Hub (@Anurag9793) October 20, 2026
आयसीसीच्या कडक नियमांनुसार, २४ महिन्यांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूच्या खात्यात चार किंवा त्यापेक्षा अधिक डिमेरिट पॉईंट जमा झाल्यास त्याचे रूपांतर निलंबनाच्या गुणांमध्ये होते. दोन निलंबन गुण मिळाल्यास संबंधित खेळाडूवर एका कसोटी सामन्यासाठी किंवा दोन एकदिवसीय अथवा दोन टी-२० सामन्यांसाठी बंदी घातली जाते. खेळाडूच्या शिस्तविषयक नोंदींमध्ये हे डिमेरिट पॉईंट २४ महिने कायम राहतात आणि त्यानंतर ते आपोआप रद्द होतात.
२५ चेंडूंत ५५ धावा कुटून भारताला जिंकवली होती मालिका –
मैदानावर हा शिस्तभंगाचा प्रकार घडला असला तरी दुसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजीत शफालीने कोणतीही कसर सोडली नव्हती. तिने अवघ्या २५ चेंडूंत ५५ धावांची स्फोटक खेळी साकारत भारताच्या एकतर्फी विजयात मोलाचा वाटा उचलला होता. झिम्बाब्वेला १०२ धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाने अवघ्या नवव्या षटकातच १ बाद १०३ धावा करून सामना आणि तीन सामन्यांची मालिका २-० ने खिशात घातली. आता मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना २० ऑक्टोबर रोजी रायपूरमध्येच खेळवला जाणार आहे.





