IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! जडेजाला मिळाली मोठी जबाबदारी

IND vs WI BCCI Announces Indian Test Squad : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांनी गुरुवारी ही घोषणा केली. यावेळी शुबमन गिल याच्याकडे कर्णधारपदाची धुरा कायम ठेवण्यात आली असून, अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
करुण नायरला दिला डच्चू –
या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजने यापूर्वीच आपल्या संघाची घोषणा केली होती, तर बीसीसीआयने 25 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची यादी जाहीर केली. यामध्ये जसप्रीत बुमराहला संघात स्थान मिळाले आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आठ वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या करुण नायर याला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली होती.
रवींद्र जडेजाची उपकर्णधारपदी वर्णी –
🚨 Presenting #TeamIndia‘s squad for the West Indies Test series 🔽#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/S4D5mDGJNN
— BCCI (@BCCI) September 25, 2025
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजाला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधारपद होते. मात्र, दुखापतीमुळे तो या मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे जडेजाला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यात रवींद्र जडेजाने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. या मालिकेत त्याने पाच सामन्यांत 516 धावा केल्या, ज्यात पाच अर्धशतके आणि एक शतक यांचा समावेश होता.
पडिक्कलचे पुनरागमन, जगदीशनला संधी
या मालिकेत फलंदाज देवदत्त पाडिक्कल याचे पुनरागमन झाले आहे. यापूर्वी त्याला इंग्लंड मालिकेत स्थान मिळाले नव्हते. तसेच, ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दुसरा यष्टीरक्षक म्हणून एन. जगदीशन याला संघात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, इंग्लंड मालिकेतील ओव्हल कसोटीपूर्वी जगदीशनला भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले होते.
भारतीय कसोटी संघ : शुबमन गिल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पाडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, प्रसिदध कृष्णा, कुलदीप यादव, एन. जगदीशन.





