IND vs ENG : शुबमन गिलचा इंग्लंडमध्ये दबदबा! गावस्कर-सॉबर्स यांचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

IND vs ENG Shubman Gill Break Two Historic Record : भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. ओव्हल येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात गिलने दोन ऐतिहासिक विक्रम मोडले. या मालिकेत त्याने आतापर्यंत ७०० हून अधिक धावा केल्या असून, कर्णधार म्हणून त्याने दिग्गज खेळाडूंचे विक्रम उद्ध्वस्त केले आहेत.
गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षांचा मोडला विक्रम –
ओव्हल कसोटीत नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. या संघाला दुसरा धक्का केएल राहुलच्या रुपाने ३८ धावांवर बसला. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल मैदानात उतरला. त्याने सहाव्या चेंडूवर आपले खाते उघडताच या मालिकेतील त्याच्या धावांचा आकडा ७२३ वर पोहोचला.
यासह त्याने वेस्टइंडीजचा दिग्गज कर्णधार गॅरी सोबर्स यांचा १९६६ मध्ये इंग्लंड दौऱ्यात केलेला ७२२ धावांचा विक्रम मोडला. सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये कर्णधार म्हणून एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आता गिलच्या नावावर आहे.
हेही वाचा – WCL 2025 मध्ये भारताचा अभिमानी पवित्रा: स्टेडियम सोडत आफ्रिदीला दिलं सणसणीत प्रत्युत्तर, पाहा VIDEO
सुनील गावस्करांचाही मोडला विक्रम –
Shubman Gill goes past Sunil Gavaskar and becomes the Indian captain with the most runs in a Test series.#ENGvIND | #ShubmanGill pic.twitter.com/VmX79QjZru
— CricTracker (@Cricketracker) July 31, 2025
गिलने याच सामन्यात आणखी एक मोठी कामगिरी केली. भारतीय कर्णधार म्हणून एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा सुनील गावस्कर यांचा विक्रम त्याने मोडला. गावस्कर यांनी १९७८-७९ मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध ७३२ धावा केल्या होत्या. गिलने या मालिकेत ७३३ धावांसह ही कामगिरी केली असून, तो आता या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : २१व्या शतकातील दुसरीच घटना: गिलचा नकोसा विक्रम, कोहलीच्या ‘या’ क्लबमध्ये झाला सामील
गिलच्या या ऐतिहासिक कामगिरीने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत चमकदार कामगिरी करत आहे. गिलच्या या विक्रमी धावांनी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक उज्ज्वल तारा म्हणून पुढे आणले आहे.





