IND vs SL : टीम इंडियामध्ये मोठा ट्विस्ट ! ‘या’ 4 खेळाडूंना मिळालं श्रीलंका दौऱ्याचं तिकीट
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आगामी श्रीलंका दौऱ्यावरील (IND vs SL) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

IND vs SL : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आगामी श्रीलंका दौऱ्यावरील (IND vs SL) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे या मालिकेतून (IND vs SL) बाहेर पडला असून, त्याच्या जागी रणजी करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीला भारतीय संघात प्रथमच संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडे, श्रीलंकेतील फिरकीला पोषक असणाऱ्या खेळपट्ट्या लक्षात घेता भारतीय संघ व्यवस्थापनाने एक विशेष रणनीती आखली आहे. भारतीय फलंदाजांना फिरकीचा सामना करण्यासाठी उत्तम सराव मिळावा, या उद्देशाने चार युवा फिरकीपटूंना ‘नेट बॉलर’ म्हणून संघात समाविष्ट केले आहे.
टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक
श्रीलंकेतील खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंचे वर्चस्व असते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संघ व्यवस्थापनाने चार वेगवेगळ्या प्रकारच्या स्पिनर्सची निवड नेट बॉलर म्हणून केली आहे:
हर्ष दुबे (विदर्भ) – डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकीपटू
तनुष कोटियन – ऑफस्पिनर
विप्रज निगम – लेगस्पिनर
शिवांग कुमार – डावखुरा रिस्ट स्पिनर (चायनामन)
या चौघांच्या विविध शैलीतील फिरकी गोलंदाजीमुळे भारतीय फलंदाजांना श्रीलंकेतील आव्हानात्मक परिस्थितीशी जुळवून घेणे आणि सराव करणे सोपे जाणार आहे.
मुख्य संघात चार फिरकीपटू
भारतीय संघात आधीपासूनच रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार आणि सारांश जैन या चार मुख्य फिरकीपटूंचा समावेश आहे. त्यातच या चार नव्या नेट बॉलर्सच्या एन्ट्रीमुळे भारतीय संघाची फिरकीविरुद्धची तयारी अधिक मजबूत होणार आहे.
बुमराहच्या अनुपस्थितीत आकिब नबीवर नजर
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेल्या (IND vs SL) आकिब नबीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने ४३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १६२ बळी घेतले आहेत. आता कसोटी मालिकेत त्याला अंतिम ११ जणांच्या संघात पदार्पणाची संधी मिळते का, याकडे क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागले आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन आणि आकिब नबी.






