WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर, ‘या’ मैदानावर रंगणार महामुकाबला…

World Test Championship final 2025 : आयसीसीनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली आहे. इंग्लंडचे ऐतिहासिक मैदान असलेल्या लॉर्ड्सवर 11-15 जून रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. गरज भासल्यास 16 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना असेल आणि लॉर्ड्सवर प्रथमच जेतेपदाची लढत होणार आहे.
आयसीसीच्या सीईओने यासंदर्भात एक निवेदन जारी करून म्हटले आहे की,”जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा क्रिकेट जगतातील सर्वात कमी कालावधीतील सर्वात रोमांचक कार्यक्रम(Event) बनला आहे. त्यामुळे 2025 मध्ये अंतिम फेरीची तारीख जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. जगातील कसोटी क्रिकेटच्या वाढत्या आकर्षणाची ही ओळख आहे ज्याने जगभरातील चाहत्यांना त्याचे वेड लावले आहे. तिकिटांची मागणी खूप जास्त असेल, म्हणून मी लोकांना विनंती करत आहे की पुढच्या वर्षीच्या सामन्याची तिकिटे आतापासूनच बुक करा.”
The dates for next year’s World Test Championship final at Lord’s are out pic.twitter.com/BoUeMHyaSB
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 3, 2024
भारताला दोनदा विजेतेपदाची हुलकावणी…
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्ड्सवर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी 2021 मध्ये अंतिम सामन्याचे ठिकाण रोझ बाउल (साउथम्प्टन) तर 2023 मध्ये द ओव्हल (लंडन) हे ठिकाण होते. ज्यामध्ये अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते. भारताला दोन्ही वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते.
दरम्यान, 2025 चा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. येत्या काही महिन्यांत सर्वच संघ भरपूर कसोटी सामने खेळणार आहेत, त्यानंतर कोणते संघ विजेतेपदाची लढत खेळणार हे निश्चित होईल.





