IND vs SL 3rd ODI : फर्नांडोची दमदार खेळी, श्रीलंकेचे भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य…

IND vs SL 3rd ODI ( Score Update) : भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. या मालिकेत भारत 1-0 ने पिछाडीवर आहे. आता हा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक अशा सामन्यात अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिसच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत सात गडी गमावून 248 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे.
Sri Lanka set a target of 249 for India! 🏏🇱🇰 The stage is set for a thrilling defense. Let’s bring it home and clinch the series! 💪 #SLvIND pic.twitter.com/oIeOTU2Kvu
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 7, 2024
श्रीलंकेकडून फलंदाजीत अविष्का फर्नांडोने 102 चेंडूत सर्वाधिक 96 धावांची शानदार खेळी केली. त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. कुसल मेंडिसने 4 चौकाराच्या मदतीने 59 धावांची तर सलामीवीर पथुम निसांका याने 65 चेंडूत 45 धावांची खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर कामिंडू मेंडिस 19 चेंडूत 23 धावा करून नाबाद राहिला.
एकवेळ श्रीलंकेचा संघ 280 ते 300 पर्यंत सहज जाईल असे वाटत होते, पण रियान परागने अप्रतिम गोलंदाजी करत सामन्याचे चित्र फिरवले. एकवेळ श्रीलंकेची धावसंख्या एका विकेटवर 170 अशी होती. अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस क्रीजवर होते. श्रीलंकेचा संघ 280 धावांपर्यंत सहज पोहोचेल असे वाटत होते. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने चेंडू रियान परागकडे सोपवला. पराननेही कर्णधाराला निराश केले नाही आणि तो येताच धोकादायक दिसत असलेल्या फर्नांडोला पायचीत (एलबीडब्ल्यू) आऊट केले. रियान पराग इथेच थांबला नाही. यानंतर त्याने चारिथ असलंका आणि दुनिथ वेल्लालाघे यांनाही बाद केले. पुन्हा एकदा श्रीलंकेची मधली फळी ढासळली आणि 1 बाद 170 वरून संघाला 50 षटकांत 248 धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारताकडून गोलंदाजीत पहिला वनडे सामना खेळणाऱ्या रियान परागने या सामन्यात 9 षटकात 54 धावा देत 3 बळी घेतले. टी-20 मालिकेप्रमाणेच परागने एकदिवसीय सामन्यांमध्येही दमदार गोलंदाजी केली आणि सामन्याचे चित्र फिरवले. मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.





