IND vs SL 1st ODI : रोहितचे अर्धशतक व्यर्थ, भारत-श्रीलंकेतील पहिला एकदिवसीय सामना अनिर्णित…

IND vs SL 1st ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बरोबरीत (अनिर्णित) सुटला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत आठ गडी गमावून 230 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 47.5 षटकांत 10 गडी गमावून 230 धावाच करू शकला. अशाप्रकारे सामना कोणताही निकालाविना संपला. मालिकेतील पुढील सामना 04 जुलै रोजी होणार आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ सहज विजय मिळवेल असे अपेक्षित असताना यजमान श्रीलंकेने पाहुण्या टीम इंडियाला चांगलाच संघर्ष करण्यास भाग पाडले. टीम इंडियाला कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली, त्याने कठीण खेळपट्टीवरही 47 चेंडूत 58 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 3 षटकारही लगावले. एकवेळ भारताने एकही विकेट न गमावता 75 धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर संघ मोठ्या भागीदारीसाठी संघर्ष करताना दिसला.
Things went down to the wire in Colombo as the match ends in a tie!
On to the next one.
Scorecard ▶️ https://t.co/4fYsNEzggf#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/yzhxoyaaet
— BCCI (@BCCI) August 2, 2024
राहुल- अक्षरची भागीदारी व्यर्थ…
भारतीय संघाने 132 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या आणि तरीही विजयासाठी 99 धावा करायच्या होत्या. येथून केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यात अर्धशतकी पण अत्यंत महत्त्वाची भागीदारी रचली गेली. केएल राहुलने 43 चेंडूत 31 धावा केल्या, तर अक्षर पटेलने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले आणि 57 चेंडूत 33 धावा केल्या. राहुल आणि अक्षर यांनी मिळून 57 धावा जोडल्या. पण ही भागीदारी टीम इंडियासाठी कामी येऊ शकली नाही.
असलंकाने सामन्याचे चित्र फिरवले…
त्यानंतर 47 षटक संपल्यानंतर भारतीय संघाने 8 विकेट गमावून 226 धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी फक्त 5 धावा करायच्या होत्या. श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असालंका 48 व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवर एकही धाव आली नाही, पण तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. अशा स्थितीत भारताला विजयासाठी 15 चेंडूत केवळ एक धाव करायची होती, पण चौकार लगावल्यानंतर दुबे पुढच्याच चेंडूवर 25 धावांवर बाद झाला. भारताला 1 धावा करायच्या होत्या, पण फक्त एक विकेट हातात होती. पुढच्याच चेंडूवर असलंकाने अर्शदीप सिंगलाही बाद केले. यासह यजमानांनी हा सामना अनिर्णित केला.
हे फलंदाज ठरले अपयशी…
वॉशिंग्टन सुंदरला फलंदाजीच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले, तो केवळ 5 धावा करून बाद झाला. विराट कोहलीही जवळपास 9 महिन्यांनंतर एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात आला होता, पण त्याला केवळ 24 धावा करता आल्या. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर, श्रेयस अय्यर संघात परतला आहे आणि त्याला मोठी खेळी खेळून संघात आपले स्थान पक्के करण्याची संधी होती, परंतु त्याच्या बॅटमधून केवळ 23 धावा निघाल्या. सलामीवीर शुबमन गिललाही फक्त 16 धावाच करता आल्या.
श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि कर्णधार चरिथ असलंका यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले, तर डुनिथ वेललेजने 2, असिथा फर्नांडो आणि अकिला धनंजया यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि 101 धावांवरच त्यांनी पाच विकेट गमावल्या होत्या. मात्र, आधी निशांका आणि नंतर वेलालगे यांनी शानदार अर्धशतके झळकावत श्रीलंकेचा डाव सावरला आणि भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले. श्रीलंकेने 50 षटकांत आठ गडी गमावून 230 धावापर्यंत मजल मारली होती.
श्रीलंकेच्या सहाव्या ते नवव्या फळीतील फलंदाजांनी मिळून एकूण 123 धावा जोडल्या. यामध्ये दुनिथ वेलालगे याने 65 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 67 धावांची खेळी केली तर पथुम निसांकाने 75 चेंडूत 9 चौकारासह 56 धावांची खेळी केली. जनिथ लियानागेने 20 ,वानिंदु हसरंगाने 24 आणि अकीला धनंजय याने 17 धावांचे योगदान दिले. कर्णधार चरिथ असलंका केवळ 14 धावा करू शकला.
भारताने या सामन्यात 7 गोलंदाजांचा वापर केला, त्यापैकी 6 गोलंदाजांनी किमान एक विकेट घेतली. अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, पण सर्वात महत्त्वाची विकेट शिवम दुबेने घेतली, ज्याने 56 धावांवर पथुम निसांकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. निसांका खूप चांगल्या टचमध्ये असल्याचे दिसत होते, पण मोठी धावसंख्या गाठण्यापूर्वीच त्याने आपली विकेट गमावली. मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





