Laxmi Ratan Shukla slams Agarkar Gambhir : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे निराशाजनक प्रदर्शन सुरू आहे. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मोहम्मद शमीचे प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला यांनी भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कोच गौतम गंभीर यांच्या निवड प्रक्रियेवर जोरदार टीका केली आहे. शुक्ला यांनी दोघांना फटकारत म्हटले आहे की, “ही देशाची टीम आहे, कुणाच्या घरची नाही.” लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राग अनावर – न्यूज २४ शी विशेष संवाद साधताना लक्ष्मी रतन शुक्ला म्हणाले की, जो क्रिकेटला सन्मान देईल, क्रिकेटही त्याला सन्मान देईल. भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेवर बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि म्हंटले, “ज्याची लाठी त्याची म्हैस. देव सर्वांचा अहंकार शांत ठेवो. केवळ टीम इंडियात हर्षित राणाला खेळवल्याने काही होणार नाही. ही देशाची टीम आहे, कुणाच्या घरची नाही.” मोहम्मद शमीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? मोहम्मद शमीने चांगले प्रदर्शन करूनही त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि नंतरच्या वनडे मालिकेसाठी संधी मिळाली नाही. यावर बोलताना लक्ष्मी रतन शुक्ला यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, शमी निवडीअभावी कधीही निराश होत नाही, कारण त्याला माहित आहे की, “ही टीम देशाची आहे, कुणाच्या घरची नाही.” शमीचे काम उत्तम प्रदर्शन करणे आहे आणि तो ते व्यवस्थित करत आहे. हेही वाचा – Sunil Gavaskar : कोलकाता पिचवर ओरड, पर्थवर मौन; गावसकरांनी उघड केले ICCचे दुटप्पी धोरण याव्यतिरिक्त, शमीला जाणीवपूर्वक संधी दिली जात नसल्याचा आरोपही शुक्ला यांनी केला. यापूर्वी अजित आगरकरने शमीबद्दल बोलताना म्हटले होते की, इंग्लंड दौऱ्यापूर्वी शमी तंदुरुस्त नव्हता, त्यामुळे त्याची निवड झाली नाही. याला उत्तर देताना लक्ष्मी रतन शुक्ला म्हणाले की, शमी पूर्णपणे तंदुरुस्त होता. ज्या पद्धतीने त्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवला, तो सर्वांनी पाहिला आहे. यंदाच्या रणजी हंगामात शमीने ४ सामन्यांमध्ये २० विकेट्स घेतल्या आहेत.