IND vs PAK : रौफ-फरहानवर ICC च्या कारवाईची टांगती तलवार, सूर्यकुमार यादवला दिलासा

IND vs PAK Suryakumar Yadav escapes with a warning : आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यापूर्वी साहिबझादा फरहान आणि हरिस रौफ या दोन पाकिस्तानी खेळाडूंना मोठा धक्का बसू शकतो. बीसीसीआयच्या तक्रारीच्या आधारे आयसीसी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तक्रार निष्फळ ठरली आहे. कारण आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला केवळ इशारा देऊन सोडले.
सूर्यकुमार यादववर काय होता आरोप?
14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांप्रती संवेदना व्यक्त करताना आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय सैन्याला हा विजय समर्पित करताना एक वक्तव्य केले होते. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आक्षेप घेत आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी 25 सप्टेंबर रोजी झाली.
सूर्यकुमार यादवला देण्यात आला फक्त इशारा –
पीटीआयच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव यांनी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन आणि क्रिकेट ऑपरेशन व्यवस्थापक समर मल्लापुरकर यांच्यासह सामना रेफ्री रिची रिचर्डसन यांच्यासमोर हजेरी लावली. सूर्यकुमारने आपला अपराध स्वीकारला नाही आणि त्याचे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित नसल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा – IND A vs AUS A : भारतीय संघाने रचला इतिहास! ‘या’ खास पराक्रमाची नोंद करणारा ठरला जगातील पहिलाच संघ
आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी सामान्यतः इशारा किंवा सामन्याच्या मानधनाच्या 15% दंड आकारला जातो. मात्र, सूर्यकुमार यांना फक्त इशारा देऊन सोडण्यात आले. रिचर्डसन यांनी त्याला अशा वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला, ज्यांना राजकीय अर्थ लावला जाऊ शकतो. अशा प्रकारे पाकिस्तानची तक्रार निरर्थक ठरली आहे.
रौफ आणि फरहान यांच्यावर कारवाईचे संकट –
दरम्यान, बीसीसीआयने पाकिस्तानचे खेळाडू हारिस रौफ आणि साहिबझादा फरहान यांच्या कथित गैरवर्तनाची तक्रार आयसीसी कडे केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. जर हे खेळाडू दोषी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, ज्यामुळे पाकिस्तानच्या अंतिम सामन्यापूर्वीच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो.





