Ind vs Pak Asia Cup 2025 : ‘माझं कुंकू-माझा देश…’; ठाकरे गटाचे राज्यभर तीव्र आंदोलन

Ind vs Pak Asia Cup 2025 – मुंबईमध्ये भारत-पाकिस्तान हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यामुळे राज्यात आणि देशात राजकारण तापले आहे. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाने हा सामना खेळू नये, या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. या सामन्याविरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षाने राज्यभरात ठिकठिकाणी ‘माझं कुंकू-माझा देश’ हे आंदोलन केले.
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी कुंकू आणि बांगड्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पाठवली. मुंबई, पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी ठाकरेसेनेकडून ‘माझा देश, माझं कुंकू’ हे आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर, नाशिक, नांदेड, जळगाव, भिवंडी, यवतमाळ अशा अनेक ठिकाणी केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सौभाग्य गमावलेल्या माता-भगिनींचे अश्रू सुकले नसताना मोदी सरकारने पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडण्याचा आरोप ठाकरेसेनेने केला आहे. यवतमाळमध्ये रक्तरंजित क्रिकेटचे पिच तयार करून त्यावर टीव्ही, स्टम्प, बॅटवर पेट्रोल टाकून जाळण्यात आले.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या विरोधात कोल्हापुरातील महाद्वार रोडवर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी हातात सिंदूर आणि केकची पाकिटे घेऊन मोदी सरकारविरोधात, पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या सिंदूरची किंमत मोदी सरकारला कळणार नाही, त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही सिंदूरच्या डब्या पाठवत आहोत, असे महिला आंदोलकांनी म्हटले. नांदेडमध्येही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शविण्यात आला.
या आंदोलनाला महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. भिवंडी शहरातही ठाकरेसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्व महिलांनी कुंकवाची डबी पेटीमध्ये एकत्रित करून आपला संताप व्यक्त केला आहे.





