IND vs ENG : राहुल-यशस्वीने लीड्सवर रचला नवा इतिहास, मोडला ३९ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम

IND vs ENG Jaiswal Rahul break 39 year old record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून, पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी उतरलेल्या यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने सावध फलंदाजी करत ३९ वर्षांचा मोठा विक्रम मोडला. आता लीड्सच्या मैदानावर भारतीय सलामी जोडीने पहिल्या गड्यासाठी सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
गावस्कर-श्रीकांतचा ३९ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम –
लीड्सच्या मैदानावर या सामन्यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावांची सलामीची भागीदारी करण्याचा विक्रम सुनील गावस्कर आणि के. श्रीकांत यांच्या नावावर होता. दोघांनी १९८६ मध्ये येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली होती. आता यशस्वी जायसवाल आणि केएल राहुल यांच्या सलामीच्या जोडीने हा ३९ वर्षांचा जुना विक्रम मोडून नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे.
A solid start from #TeamIndia openers in Headingley 🙌
Fifty partnership 🆙 between KL Rahul and Yashasvi Jaiswal 👏
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND | @klrahul | @ybj_19 pic.twitter.com/IIVYwByVuY
— BCCI (@BCCI) June 20, 2025
तसेच, लीड्स येथे २०१३ नंतर प्रथमच अशी वेळ आली आहे की, टेस्ट सामन्यात पाहुण्या संघाच्या सलामीच्या जोडीला ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करण्यात यश मिळाले आहे. यापूर्वी २०१३ मध्ये पीटर फुल्टन आणि हामिश रदरफोर्ड यांच्या जोडीने या मैदानावर ५० धावांची सलामीची भागीदारी केली होती.
हेही वाचा – IND vs ENG : साई सुदर्शनच्या पदार्पणाचा अजब योगायोग; द्रविड, गांगुली, कोहलीच्या पावलावर पाऊल ठेवण्यास सज्ज!
राहुल-यशस्वीची दुसऱ्यांदा ५० पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी –
केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी पाहायला मिळाली आहे. यापूर्वी, नोव्हेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २०१ धावांची भागीदारी केली होती. यशस्वी जैस्वाल इंग्लंडमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे, तर केएल राहुलला तिथे खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे ही सलामीची जोडी मालिकेत भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा – W, 0, W, W, W… ५ चेंडूत ४ विकेट्स घेत मारली बाजी; शेवटच्या षटकात हरलेला सामना जिंकला, पाहा VIDEO
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत दोन गडी गमावले आहेत. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती आणि पहिल्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी केली होती. ही भागीदारी ब्रायडन कार्सने केएल राहुलला बाद करून तोडली. केएल राहुल ७८ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला, तर पदार्पणवीर साई सुदर्शनला ४ चेंडूत खातेही खोलता आले नाही. ज्यामुळे भारताची धावसंख्या २५.४ षटकानंतर २ बाद ९२ धावा झाली.





