IND vs ENG Test Series : जयस्वाल, बुमराह व अश्विन विक्रमांच्या पंक्तीत….

IND vs ENG 2nd Test (विशाखापट्टणम) – इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी १०६ धावांनी जिंकत भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाल, जसप्रीत बुमराह व रवीचंद्रन अश्विन यांच्या नावावर काही विक्रमही जमा झाले आहेत.
इंग्लंडच्या दुसर्या डावात अश्विनने ३ बळी घेऊन इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सर्वात जलद १५० बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तर यशस्वी जयस्वाल द्विशतक फटकावणारा भारताचा तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला.
शतक फटकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज
जयस्वाल भारतासाठी शतक फटकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी १९९३ साली २१ वर्षे ३५ दिवस वय असताना विनोद कांबळीनेतर १९७१ साली २१ वर्षे २८३ दिवस वय असताना विक्रमादीत्य सुनील गावस्कर यांनी ही कामगिरी केली होती. कांबळीने सर्वात तरुण असताना दोनदा द्विशतक फटकावले आहे. प्रथम २१ वर्षे ३५ दिवस आणि नंतर वयाच्या २१ वर्षे ५५ दिवसांनी त्याने द्विशतक साकार केले. यशस्वीने द्विशतक साकार केले तेव्हा त्याचे वय २२ वर्षे २७ दिवस होते.
बुमराहचे दीडशेपेक्षा जास्त बळी
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १५० बळी पूर्ण केले. १५० पेक्षा जास्त बळी घेणाऱ्यांच्या यादीत बुमराह सर्वोत्तम सरासरीने दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची सरासरी २०.२८ आहे. तसेच बुमराह कमीत कमी चेंडूंत सर्वात जलद १५० बळी पूर्ण करणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने ६७८१ चेंडूंत म्हणजेच ११३०.१ षटकांत १५० बळी पूर्ण केले. यापूर्वी हा विक्रम उमेश यादवच्या नावावर होता. त्याने ७६६१ चेंडूत १५० बळी पूर्ण केल्या होत्या.
#U19WorldCup2024 : रोमांचक सामन्यात ‘टीम इंडिया’चा विजय, आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत मारली धडक…
अश्विनचे इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक बळी
भारताचा अनुभवी ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात ३ बळी घेतले होते. त्याने बेन डकेट, ऑली पोप आणि जो रूट यांना बाद केले. त्यातील पोपला बाद केल्यावर तो इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा भारतीय फिरकी गोलंदाज बनला. त्याच्या नावावर आता २१ कसोटीत ९७ बळी आहेत. त्याने २३ कसोटीत ९५ गडी बाद केलेल्या भागवत चंद्रशेखर यांना मागे टाकले आहे.





