ICC Test Rankings : कसोटी क्रमवारीत भारताला मोठा धक्का! बुमराह-गिलची घसरण तर पडिक्कलची सरशी, टी-२० मध्ये किशन अव्वल
ICC Test Rankings : ताज्या कसोटी क्रमवारीत शुबमन गिल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना मोठा फटका बसला आहे.

ICC Test Rankings Shubman Gill Jasprit Bumrah Slip Devdutt Padikkal Jump Ishan Kishan T20I : आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना मोठा फटका बसला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर गिल फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांनी घसरून थेट नवव्या क्रमांकावर फेकला गेला आहे, तर गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराहने दुसरे स्थान गमावून तो तिसऱ्या स्थानी घसरला आहे. मात्र, दुसरीकडे युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलला या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.
पंत सातव्या स्थानी कायम; दोन शतके ठोकणाऱ्या पडिक्कलची मोठी झेप!
श्रीलंका दौऱ्यावरील तीन डावांत गिलच्या बॅटमधून केवळ एकच अर्धशतक निघाल्याने त्याला क्रमवारीत नुकसान सहन करावे लागले. तरीही तो भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च रँकिंग असलेला फलंदाज आहे. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सातव्या स्थानी कायम आहे, तर यशस्वी जैस्वाल ११ व्या स्थानी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत दोन शतकांसह ३२८ धावा कुटणाऱ्या देवदत्त पडिक्कलने थेट ५ स्थानांची झेप घेत ५४ वे स्थान पटकावले आहे. तर श्रीलंकेच्या सोनल दिनुषाने २९ स्थानांची झेप घेत २५ वे स्थान गाठले.
बुमराहला दुहेरी फटका; मॅट हेन्री आणि मिचेल स्टार्क गेले पुढे –
गुडघ्याच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकला होता. मैदानाबाहेर राहिल्याने त्याने यापूर्वी अव्वल स्थान गमावले होते. आधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने आणि आता ताज्या क्रमवारीत न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने बुमराहला मागे टाकले आहे. त्यामुळे बुमराह आता तिसऱ्या स्थानी घसरला आहे. असे असले तरी अष्टपैलूंच्या यादीत भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा ४२२ रेटिंग पॉइंट्ससह अजूनही जगातील नंबर-१ अष्टपैलू खेळाडू म्हणून आपले अव्वल स्थान टिकवून आहे.
टी-२० क्रमवारीत ९१० पॉइंट्ससह इशान किशन अव्वल!
कसोटीत भारतीय खेळाडूंची घसरण झाली असली, तरी टी-२० क्रमवारीत भारताचा दबदबा पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेपूर्वी भारताचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन तब्बल ९१० रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी राज्य करत आहे. या यादीत पाकिस्तानचा साहिबजादा फरहान दुसऱ्या तर भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा ८१९ रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.





