IND vs ENG : साई सुदर्शनच्या नावावर लज्जास्पद विक्रमाची नोंद, ‘ही’ नकोशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

IND vs ENG Sai Sudharsan unwanted record : कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, परंतु हा मंच अनेकदा कठीण आव्हानेही घेऊन येतो. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा युवा फलंदाज साई सुदर्शनने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु त्याची ही सुरुवात निराशाजनक ठरली. हेडिंग्ले, लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, पण तो खाते न उघडताच बाद झाला. यासह त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
साई सुदर्शन ठरला पहिलाच फलंदाज –
साई सुदर्शनला आपल्या पहिल्या कसोटी डावात केवळ चार चेंडूंचा सामना करता आला आणि बेन स्टोक्सचा बळी ठरला. यासह तो भारतीय कसोटी इतिहासातील पहिला फलंदाज ठरला, जो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पदार्पणात शून्यावर बाद झाला. ज्यामुळे त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. अशा प्रकारे सुदर्शनसाठी कसोटी पदार्पणाची पहिली खेळी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती.
Bittersweet day for Sai Sudharsan, as he became the 317th Indian Test cricketer and the first Indian batter to be dismissed for a duck in his maiden Test innings since 2011.#ENGvIND #SaiSudharsan #TeamIndia pic.twitter.com/reCl0DQXJe
— Circle of Cricket (@circleofcricket) June 20, 2025
साई सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील अप्रतिम फलंदाजीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, या मोठ्या संधीचा फायदा त्याला घेता आला नाही. सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या ताफ्यात चेतेश्वर पुजाराने त्याला टेस्ट कॅप देऊन हा क्षण खास बनवला होता. मात्र, मैदानावर हा युवा फलंदाज आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला.
हेही वाचा – IND vs ENG : साई सुदर्शनने केली इतिहासाची पुनरावृत्ती, ३८ वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुन्हा ‘असं’ घडलं
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी केली, त्यांनी ९१ धावांची भागीदारी रचली. राहुल बाद झाल्यानंतर सुदर्शन मैदानावर आला, पण त्याची खेळी फक्त चार चेंडूंत संपली. बेन स्टोक्सच्या एक चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करुन यष्टिरक्षक जेमी स्मिथच्या हातात विसावला, ज्यामुळे सुदर्शनला खाते न उघडात पॅव्हिलियनमध्ये परतावे लागले.
हेही वाचा – IND vs ENG : राहुल-यशस्वीने लीड्सवर रचला नवा इतिहास, मोडला ३९ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम
सुदर्शन या यादीत झाला सामील –
साई सुदर्शन पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात खाते न उघडता बाद होणारा भारताचे पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी गुंडप्पा विश्वनाथ, कृष्णम्माचारी श्रीकांत, देवांग गांधी आणि विजय भारद्वाज यांच्यासारखे खेळाडूही या नकोशा विक्रमाचा भाग बनले आहेत. ज्यांना आपले खाते उघडता आले नव्हते.





