IND vs ENG : अखेर मँचेस्टर कसोटी अनिर्णीत! जडेजा-सुंदरच्या शतकाने इंग्लंडच्या मनसुब्यावर फेरलं पाणी

IND vs ENG Manchester Test Draw : भारतीय संघाने मँचेस्टर कसोटीत जबरदस्त पुनरागमन करत इंग्लंडविरुद्धचा चौथा सामना अनिर्णीत राखला. या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी शुबमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडची ३११ धावांची आघाडी संपवली आणि पूर्ण दिवस फलंदाजी करत पराभव टाळला.
चौथ्या दिवशी ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडने ३११ धावांची आघाडी घेतली होती आणि पहिल्याच षटकात दोन गडीही बाद केले होते. येथून भारतीय संघाचा पराभव जवळजवळ निश्चित वाटत होता, पण शेवटच्या पाच सत्रांमध्ये शुबमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांच्या शतकांसह केएल राहुलच्या अविस्मरणीय खेळीने भारतीय संघाला पराभवापासून वाचवले.
𝗧𝘄𝗼 𝗚𝗼𝗼𝗱! 💯💯
2⃣0⃣3⃣*(334)
Ravindra Jadeja 🤝 Washington Sundar
Scorecard ▶️ https://t.co/L1EVgGtx3a#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/guzRkCjs4s
— BCCI (@BCCI) July 27, 2025
गिल आणि राहुलने रचला भारताचा पाया –
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारत १-२ ने मागे होता आणि मालिका गमावण्याचा धोका होता. चौथ्या दिवशी भारताचा कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल यांनी १७४ धावांची शानदार भागीदारी करून सामना अनिर्णीत राखण्याची आशा जागवली. पण शेवटच्या दिवशी भारताला १३७ धावांची आघाडी घ्यायची होती. पहिल्या सत्रात बेन स्टोक्सने केएल राहुलला ९० धावांवर बाद केले, ज्यामुळे त्याचे शतक अवघ्या १० धावांनी हुकले.
हेही वाचा – IND vs ENG : रवींद्र जडेजाने इंग्लंडमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई खेळाडू
इंग्लंडला जडेजाचा झेल सोडणे पडले महागात –
दुसरीकडे, गिलला डोके आणि हाताला दुखापत झाली होती, तरीही त्याने लढा देत मालिकेतील आपले चौथे शतक पूर्ण केले. पण सत्र संपण्यापूर्वी जोफ्रा आर्चरने गिलला (१०२) बाद केले आणि भारताचा डाव अडचणीत आला. याचवेळी रवींद्र जडेजा मैदानात आला, पण पहिल्याच चेंडूवर स्लिपमध्ये त्याचा झेल जो रूटने सोडला. त्यावेळी भारतीय संघ ८९ धावांनी मागे होता. पण यानंतर जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी इंग्लंडला एकही संधी दिली नाही.
हेही वाचा – Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीसाठी दक्षिण विभागाचा संघ जाहीर! तिलक वर्मा सांभाळणार धुरा
जडेजा-सुंदरच्या शतकाने इंग्लंडच्या मनसुब्यावर फेरलं पाणी –
दुखापतीमुळे ऋषभ पंतच्या जागी बढती मिळालेल्या सुंदरने आणि जडेजाने पुढची दोन सत्रे शानदार फलंदाजी केली. त्यांनी ३३४ चेंडूंमध्ये २०३ धावांची नाबाद भागीदारी करत भारताला ४२५ धावांपर्यंत नेले. शेवटच्या सत्रात दोघांनीही शतके झळकावली. जडेजाने १०७ नाबाद (पाचवे टेस्ट शतक) आणि सुंदरने १०१ नाबाद (पहिले टेस्ट शतक). यामुळे भारताला ११४ धावांची आघाडी मिळाली आणि दोन्ही संघांनी सामना अनिर्णीत राखण्यावर सहमती दर्शवली.





