IND vs ENG : रवींद्र जडेजाने इंग्लंडमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई खेळाडू

IND vs ENG Ravindra Jadeja All Rounder Performance : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपल्या फलंदाजीने कमाल केली आहे. गेल्या ६ डावांमध्ये जडेजाने ५ अर्धशतके झळकावत भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रांत अप्रतिम कामगिरी करत जडेजाने इंग्लंडच्या भूमीवर इतिहास रचला आहे. तो असा पराक्रम करणारा आशियातील पहिला खेळाडू ठरला आहे. यासोबतच त्याने एका दिग्गज खेळाडूच्या विक्रमाशी बरोबरीही केली आहे.
रवींद्र जडेजाने रचला इतिहास
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये रवींद्र जडेजाने फलंदाजीत इतिहास घडवला आहे. या मालिकेत त्याने ५ अर्धशतके ठोकली आहेत. यासह त्याने इंग्लंडच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये १,००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. यासोबतच, जडेजा हा इंग्लंडमध्ये ३० पेक्षा जास्च विकेट्स आणि १,००० धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आशियातील ७ फलंदाजांनी इंग्लंडमध्ये १,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तर १८ गोलंदाजांनी ३० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. पण जडेजा हा एकमेव खेळाडू आहे ज्याने हे दोन्ही पराक्रम एकाचवेळी केले आहेत. सध्या तो फलंदाजीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
गॅरी सोबर्स यांच्या विक्रमाशी केले बरोबरी –
1⃣0⃣0⃣0⃣ Test runs in England & going solid 💪 💪
Well done, Ravindra Jadeja 👍
Updates ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#TeamIndia | #ENGvIND | @imjadeja pic.twitter.com/makPRXnlsb
— BCCI (@BCCI) July 27, 2025
एका कसोटी मालिकेत सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक अर्धशतके करण्याचा विक्रम दिग्गज सर गॅरी सोबर्स यांच्या नावावर होता. सोबर्स यांनी ५ अर्धशतके केली होती. आता रवींद्र जडेजाने त्यांच्या या विक्रमाशी बरोबरी केली आहे. जर जडेजाने शेवटच्या कसोटी सामन्यात आणखी एक अर्धशतक केले, तर तो या यादीत सर्वात पुढे जाईल. याशिवाय, भारताच्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही २००२ मध्ये एका मालिकेत ५ अर्धशतके केली होती. गोलंदाजीतही जडेजाने या सामन्यात ४ विकेट्स घेत आपली छाप पाडली आहे.
हेही वाचा – Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीसाठी दक्षिण विभागाचा संघ जाहीर! तिलक वर्मा सांभाळणार धुरा
एकाच कसोटी मालिकेत सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे भारतीय खेळाडू :
- ५ वेळा: व्हीव्हीएस लक्ष्मण (वेस्ट इंडिजविरुद्ध, २००२)
- ५ वेळा: रवींद्र जडेजा (इंग्लंडविरुद्ध, २०२५)
- ४ वेळा: दत्तू फडकर (ऑस्ट्रेलियाविरुद्ध, १९४८-४९)
- ४ वेळा: एमएस धोनी (इंग्लंडविरुद्ध, २०१४)
- ४ वेळा: आर अश्विन (इंग्लंडविरुद्ध, २०१६-१७)





