IND vs ENG Test Series : जगातील टॉप-4 फलंदाजांमध्ये स्थान मिळवणाऱ्या जो रूटची फलंदाजीत कामगिरी भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सुमार राहिली आहे. आतापर्यंत झालेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. सध्या रूटच्या शॉट निवडीवर बरीच टीका होत आहे. इंग्लंडची मीडिया त्याच्या मागे लागली आहे. त्याच्या संघाचा फिरकी गोलंदाज टॉम हार्टलीने रूटपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूच्या नावावर 138 कसोटीत 11 हजार 493 धावा आहेत. त्याने 30 शतके झळकावली आहेत, पण भारतात त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत.
रूटला तीन सामन्यांच्या चार डावात केवळ 77 धावा करता आल्या आहेत. त्याची सरासरी 12.83 आहे. रूटची सर्वोच्च धावसंख्या 29 आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फलंदाज म्हणून केलेल्या धावापेक्षा त्याने गोलंदाजीत जास्त षटके टाकली आहेत. रुटने तीन कसोटीत सात विकेट्सही घेतल्या आहेत. तो फलंदाजापेक्षा गोलंदाज म्हणून संघासाठी अधिक उपयुक्त ठरत आहे.
रूट भारत दौऱ्यावर आला तेव्हा तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. त्याने मागील पाच कसोटी सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली होती. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व सामने खेळले गेले.
मालिकेतील रुटची आतापर्यंतची कामगिरी…
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 29 धावा करून रूट बाद झाला. तो रवींद्र जडेजाच्या चेंडूवर बुमराहने त्याला झेलबाद झाला. दुसऱ्या डावात रुट दोन धावा करून बुमराहच्या गोलंदाजीवर एलबीडब्लू (LBW) पायचीत झाला.
विशाखापट्टणममध्ये रुट मोठी खेळी खेळेल अशी अपेक्षा होती, पण पुन्हा एकदा त्याने इंग्लिश चाहत्यांची निराशा केली. पहिल्या डावात पाच धावा केल्यानंतर शुभमन गिलने त्याला झेलबाद केले. दुसऱ्या डावात त्याला केवळ 16 धावा करता आल्या. अश्विनच्या चेंडूवर अक्षर पटेलने त्याला झेलबाद केले.
तिसऱ्या कसोटीतही रूटची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. पहिल्या डावात 18 धावा आणि दुसऱ्या डावात सात धावा केल्यानंतर तो बाद झाला. यावेळी बुमराह आणि रवींद्र जडेजाने त्याला आपला शिकार बनवले.
भारताविरूध्दची त्याची कामगिरी…
ही मालिका सोडली तर रूटने भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्याने टीम इंडियाविरुद्ध 28 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत 56.58 च्या सरासरीने 2 हजार 603 धावा केल्या आहेत. त्याने भारताविरुद्ध नऊ शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत. भारतीय मैदानावरील त्याचा विक्रम पाहिला तर त्याने 13 कसोटीत 1029 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 41.16 आहे. रूटने दोन शतके आणि पाच अर्धशतके केली आहेत.