IND vs ENG : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, परदेशात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

IND vs ENG Jasprit Bumrah five wicket hauls Records : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने पुनरागमन करताना लॉर्ड्स कसोटीत पाच विकेट्स घेत इंग्लंडला 387 धावांवर रोखले. यासह बुमराहने इतिहास रचला आहे. परदेशात सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून त्याने आपले नाव नोंदवले.
जसप्रीत बुमराहने परदेशात 13 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतले आहेत. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. यासह त्याने कपिल देव यांचा विक्रम मागे टाकला, ज्यांनी परदेशात 12 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतले होते. आता परदेशात सर्वाधिक पाच विकेट्स घेण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर आहे.
बुमराहने वसीम अक्रमच्या विक्रमाची केली बरोबरी –
Innings Break!
England are all out for 387 in the 1st innings
Jasprit Bumrah the pick of the bowlers with 5/74 🙌
Scorecard ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/0bkkeqskhe
— BCCI (@BCCI) July 11, 2025
लॉर्ड्स येथे बुमराहने प्रथमच पाच विकेट्स घेतले. यासह त्याने कपिल देव यांचा विक्रम मोडताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमची बरोबरी केली आहे. SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सर्वाधिक पाच विकेट्स घेणारा आशियाई खेळाडू म्हणून वसीम अक्रमने 11 वेळा हा पराक्रम केला होता. आता बुमराहनेही या विक्रमाची बरोबरी केली आहे.
हेही वाचा – IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत शुबमन गिल आणि अंपायरची जुंपली, काय होतं कारण? पाहा VIDEO
भारतासाठी परदेशात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारे गोलंदाज (फाइव्ह-विकेट्स हॉल) :
- जसप्रीत बुमराह: 35 सामन्यांत 168 विकेट, 13 वेळा पाच विकेट्स
- कपिल देव: 66 सामन्यांत 215 विकेट, 12 वेळा पाच विकेट्स
- अनिल कुंबले: 69 सामन्यांत 269 विकेट, 10 वेळा पाच विकेट्स
- रविचंद्रन अश्विन: 41 सामन्यांत 154 विकेट, 8 वेळा पाच विकेट्स
- भगवत चंद्रशेखर: 26 सामन्यांत 100 विकेट, 8 वेळा पाच विकेट्स
- हरभजन सिंग: 48 सामन्यांत 152 विकेट, 7 वेळा पाच विकेट्स
हेही वाचा – IND vs ENG : जसप्रीत बुमराहचा कहर! कपिल देवचा विक्रम मोडत गुंडाळला इंग्लंडचा डाव
इंग्लंडचा पहिला डाव 387धावांवर आटोपला-
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ 4 बाद 251 धावांवर संपवला होता. त्यावेळी जो रूट 99 धावांवर आणि बेन स्टोक्स 39 धावांवर खेळत होते. यानंतर दुसऱ्या दिवशी जो रूटने शतकी, तर जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 387 धावांपर्यंत मजल मारता आला. भारताकडून बुमराहने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या, तर रेड्डी-सिराजने प्रत्येकी दोन आणि जडेजाने एक विकेट्स घेतली.





