IND vs ENG : ख्रिस वोक्सने मागितली पंतची माफी, गिलने केले कौतुक; कसोटी मालिकेत शौर्याची झलक!

IND vs ENG Pant and Woakes Show Grit : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. एक सामना अनिर्णित राहिला. या मालिकेदरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्स यांना दुखापती झाल्या, ज्यामुळे दोघेही पाचवा कसोटी सामना खेळू शकले नाहीत.
पंतला दुखापत, वोक्सने मागितली माफी –
चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत स्वीप शॉट खेळताना ख्रिस वोकसच्या गोलंदाजीवर जखमी झाला. त्याच्या पायाच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली, तरीही त्याने वेदनांवर मात करत फलंदाजी सुरू ठेवली. दुसरीकडे, पाचव्या कसोटी सामन्यात ख्रिस वोक्सचा खांदा निखळला, तरीही तो फलंदाजीला उतरला. दोघांनीही दुखापतींवर मात करत आपल्या संघासाठी शौर्य दाखवले.
वोक्सचा पंतला संदेश आणि माफी –
मालिका संपल्यानंतर ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत वोक्सने सांगितले की, पंतने इंस्टाग्रामवर त्याच्या फोटोसह सॅल्यूट इमोजी शेअर केला होता. याला उत्तर देताना वोक्सने पंतला धन्यवाद दिले आणि त्याच्या पायाच्या दुखापतीतून ठिक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंतनेही वोक्सला व्हॉइस नोट पाठवून लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा मैदानावर भेटण्याची इच्छा व्यक्त केली. वोक्सने आपल्या गोलंदाजीमुळे पंतला दुखापत झाल्याबद्दल माफीही मागितली.
हेही वाचा – Sanju Samson : संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडून सीएसकेमध्ये सामील होणार? रिपोर्टमधून मोठं सत्य आलं समोर
शुबमन गिलने केले वोक्सचे कौतुक –
पाचव्या कसोटी सामन्यात वोक्स फलंदाजीला उतरला, तेव्हा त्याला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही, पण भारतीय कर्णधार शुबमन गिलने त्याच्या या धाडसाचे कौतुक केले. गिलने वोक्सला ‘अविश्वसनीय शौर्य’ दाखवल्याबद्दल प्रशंसा केली. वोक्सनेही गिल आणि भारतीय संघाच्या शानदार खेळाचे कौतुक केले. त्याने सांगितले की, दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि मालिका बरोबरीत सुटणे योग्यच आहे.
दोन्ही खेळाडूंनी दाखवले शौर्य –
ऋषभ पंतने मँचेस्टर येथे तुटलेल्या अंगठ्याने फलंदाजी करत आपल्या संघासाठी लढा दिला देत अर्धशतक ठोकले होते. त्याचबरोबर वोक्सने खांदा निखळलेला असतानाही पाचव्या कसोटीत फलंदाजीला येण्याचे धाडस दाखवले. दोन्ही खेळाडूंनी आपल्या संघासाठी प्रेरणादायी कामगिरी केली आणि चाहत्यांच्या मनात आदर कमावला.





