IND vs BAN Test Series : कोहली रचणार इतिहास, फक्त 58 धावांची गरज! ‘या’ महान खेळाडूचा विक्रम निघणार मोडीत…

IND vs BAN Test Series (Virat Kohli Record) : भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. या विक्रमाद्वारे किंग कोहली भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार आहे. कोहलीला इतिहास रचण्यासाठी फक्त 58 धावा करायच्या आहेत.
बांगलादेशविरूध्दच्या कसोटीत 58 धावा केल्यानंतर किंग कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण करेल. तो केवळ या आकड्याला स्पर्श करणार नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27 हजार धावा करणारा फलंदाज बनणार आहे. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
भारताचा महान क्रिकेटर तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 623 डावांमध्ये 27 हजार धावा करण्याचा टप्पा गाठला होता, तर कोहलीने आतापर्यंत 591 आंतरराष्ट्रीय डाव खेळले आहेत. अशा परिस्थितीत, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे डाव आहेत, ज्यामध्ये त्याला फक्त 58 धावा करायच्या आहेत. कोहलीने आतापर्यंत 26 हजार 942 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांची यादी पाहिली तर विराट कोहली हा एकमेव सक्रिय खेळाडू आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 34 हजार 357 धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकारा 28 हजार 016 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुढे जात ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंग 27 हजार 483 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर किंग कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
कोहलीची आतापर्यंतची कसोटी कारकीर्द…
विराट कोहलीच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 113 कसोटी खेळल्या आहेत. या सामन्यांच्या 191 डावांमध्ये त्याने 49.15 च्या सरासरीने 8 हजार 848 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 29 शतके आणि 30 अर्धशतके आली आहेत.





