IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत अक्षर पटेलला संधी मिळणे जवळपास निश्चित, जाणून घ्या कारण….

Axar Patel, Duleep Trophy 2024 : भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. 19 सप्टेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. पण टीम इंडियाची घोषणा दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या सामन्यानंतर केली जाऊ शकते. यामध्ये अक्षर पटेलचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. अक्षर अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत आहे. तो फॉर्मातही आहे. भारत क आणि भारत ड यांच्यातील सामन्यात अक्षरने दमदार अर्धशतक झळकावले आहे.
वास्तविक, अनंतपूरमध्ये भारत क आणि भारत ड यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात भारत ड संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 164 धावा केल्या आहेत. या वेळी अक्षर पटेल संघासाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 118 चेंडूंचा सामना करत 86 धावा केल्या. अक्षरने या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याच्या मदतीने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम भारत ‘ड’ संघाने ने 164 धावांचा टप्पा गाठला.
AXER PATEL has played a brilliant knock of 86(118) under pressure.🔥🔥#DuleepTrophy #DuleepTrophy2024 pic.twitter.com/0ZTLLeGqTl
— Dinesh Kumar (@socialist_dky) September 5, 2024
अक्षर पटेलचा रेकॉर्ड मजबूत…
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यानंतर संघाची घोषणा करू शकते. निवड समिती खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे. अक्षर फॉर्मात आहे आणि बांगलादेशविरुद्ध घातक ठरू शकतो. अक्षरने भारतासाठी आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 646 धावा केल्या आहेत. यासोबतच 55 विकेट्स देखील घेतल्या आहेत. तसेच अक्षरने अनेक वेळा भारतीय संघ अडचणीत असताना गोलंदाजीसोबत फलंदाजीतही आपली चमक दाखवलेली आहे.
अय्यर-पंत पहिल्या परीक्षेत नापास…
भारत-बांगलादेश मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर पहिल्या परीक्षेत नापास झाला आहे. भारत क संघाविरुद्ध तो अवघ्या 9 धावा करून बाद झाला. श्रेयसने 16 चेंडूंचा सामना करताना फक्त 1 चौकार लगावला. ऋषभ पंत हा भारत ब संघाचा भाग आहे. त्यालाही विशेष काही करता आले नाही. पंत 10 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. त्यालाही फक्त 1 चौकार लगावता आला.





