IND vs BAN Test Series : भारत दौऱ्यासाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा; ‘या’ युवा खेळाडूला मिळाली संधी…

India vs Bangladesh Test Series : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. बोर्डाने नजमुल हुसैन शांतोला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे त्याचबरोबर बांगलादेशने एक धक्कादायक असा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने अनकॅप्ड फलंदाज जाकर अली अनिकचा संघात समावेश केला आहे, तर वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामला दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. बांगलादेशने शाकिब अल हसन, लिटन दास आणि मेहदी हसन मिराज यांचाही संघात समावेश केला आहे.
बांगलादेशने संघ अतिशय संतुलित ठेवला आहे. त्यांनी अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे. गेल्या महिन्यातच बांगलादेशने रावळपिंडी येथे पाकिस्तान संघाचा 2-0 असा पराभव करून पाकिस्तानमध्ये पहिली मालिका जिंकून मोठी कामगिरी केली होती.आता संघ भारताविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला असून टीम इंडियाला कडवी टक्कर देऊ शकतो.
महमुदुल हसन, झाकीर हसन, शादमान इस्लाम आणि मोमिनुल हक यांनाही संधी मिळाली आहे. मुशफिकुर रहीम हा देखील संघाचा एक भाग आहे. बांगलादेशने नवोदित झाकीर अलीचा संघात समावेश केला आहे. त्याला अद्याप बांगलादेशकडून कसोटीत खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण झाकीरचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. झाकीरने 49 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 2862 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 4 शतके आणि 19 अर्धशतके केली आहेत. झाकीरची प्रथम श्रेणी डावातील सर्वोत्तम धावसंख्या 172 धावा आहे.
तसेच या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2024 मध्ये जाकर अली अनिक बांगलादेश संघाचा एक भाग होता. जाकर अली हा यष्टीरक्षक-फलंदाज आहे आणि त्याने बांगलादेशसाठी आतापर्यंत 17 टी-20 सामने खेळले आहेत ज्यात त्याच्या नावावर 245 धावा आहेत.
दरम्यान, भारताने शेवटचे 2019-20 मध्ये बांगलादेशचे यजमानपद भूषवले होते. या कसोटी मालिकेत टीम इंडियाने बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला होता. पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान चेन्नईत सुरू होणार आहे. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 आॅक्टोबर दरम्यान कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर, दोन्ही संघ 3 सामन्यांच्या T20I मालिकेत आमनेसामने येतील.
Bangladesh Test Squad for the India Tour 2024#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #INDvsBAN pic.twitter.com/1npeXGgkix
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 12, 2024
बांगलादेश क्रिकेट संघ : नजमुल शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, जाकिर हसन, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहदी मिराज, जाकर अली अनिक, तस्कीन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमूदुल हसन जॉय, नईम हसन, खालिद अहमद
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.





