IND vs BAN 2nd T20 :- दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताच्या विजयात युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने महत्त्वाची भूमिका बजावली. नितीशने 34 चेंडूत 74 धावांची खेळी केली आणि दोन विकेट्सही घेतल्या. सामन्यानंतर त्याने आपल्या कामगिरीचे श्रेय प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांना दिले. नितीश रेड्डी सामन्यानंतर म्हणाला, भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची बाब आहे. श्रेय कर्णधार आणि प्रशिक्षकाला जाते, त्यांनी मला मुक्तपणे खेळण्याचा परवानगी दिली. मी सुरुवातीला वेळ घेतला, पण जेव्हा मला नो बॉल मिळाला, मला वाटले की हा माझा दिवस आहे आणि यानंतर मला भविष्यातही अशीच कामगिरी करायची आहे. भारताची सुरुवात खराब झाली आणि पॉवरप्लेमध्येच सलामीवीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे बाद झाले. एकवेळ भारताची अवस्था 3 बाद 41 अशी होती. यानंतर रिंकू सिंग आणि नितीशकुमार रेड्डी यांनी शानदार भागीदारी केली. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 49 चेंडूत 108 धावांची भागीदारी केली. नितीश रेड्डीने 27 चेंडूत पहिले टी-20 अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. IND vs BAN 2nd T20 : टीम इंडियाचा बांगलादेशवर 86 धावांनी विजय, मालिकेतही घेतली अजेय आघाडी… नितीशने भारतीय डावाच्या 13व्या षटकात मेहदी हसन मिराजविरुद्ध 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. मुस्तफिजुर रहमानच्या चेंडूवर 74 धावा करून तो बाद झाला. यानंतर रिंकू सिंगनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने 20 षटकात 9 विकेट गमावत 221 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संपूर्ण संघ 20 षटकांत 9 बाद 135 धावा करू शकला.