IND vs BAN 2nd T20 : नितीश रेड्डी आणि रिंकू सिंगची वादळी खेळी, टीम इंडियाचा बांगलादेशसमोर धावांचा डोंगर….

IND vs BAN 2nd T20 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. खराब सुरुवात करूनही टीम इंडियाने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशला 222 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी शानदार अर्धशतके झळकावली, ज्याच्या बळावर संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 221 धावा केल्या.
Bangladesh Tour of India 2024
India 🆚Bangladesh | 2nd T20iBangladesh Need 222 Runs to Win
PC: BCCI#BCB #Cricket #INDvBAN #T20 pic.twitter.com/vwMZerCU2b
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 9, 2024
एकवेळ भारताने अवघ्या 41 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यामध्ये संजू सॅमसन (10), अभिषेक शर्मा (15) आणि सूर्यकुमार यादव (08) या तीन फलंदाजांनी निराशा केली. सुरुवातीच्या धक्क्यानंतर नितीश आणि रिंकूने आक्रमक फलंदाजी केली आणि चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान नितीशने आपला दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळताना कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतरही नितीशने आपली आक्रमक फलंदाजी थांबवली नाही आणि फटकेबाजी सुरूच ठेवली.
नितीश 34 चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 74 धावा करून बाद झाला. नितीश बाद झाल्यानंतर रिंकू सिंगनेही अर्धशतक झळकावले, मात्र तो 29 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 53 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटी हार्दिक पांड्या आणि रियान पराग यांनी फटकेबाजी केली. हार्दिकने 19 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या तर परागने 6 चेंडूत 15 धावा केल्या आणि भारताची धावसंख्या 200 धावा पार नेली. पण त्यानंतर भारतीय संघाने शेवटच्या षटकात तीन विकेट गमावल्या आणि 20 षटकात 9 विकेट गमावत 221 धावा केल्या.
बांगलादेशकडून तस्किन अहमदने चार षटकांत केवळ 16 धावा देत दोन बळी घेताना चांगली गोलंदाजी केली. इतर सर्व गोलंदाजांची मात्र चांगलीच धुलाई झाली. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने तीन बळी घेतले मात्र 4 षटकात 55 धावा दिल्या. तनझिम हसन साकिब (4 षटकात 50 धावा) आणि मुस्तफिजुर रहमान (4 षटकात 36 धावा) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.





