Ind vs Ban Day-1 : कानपूर कसोटीत पावसाची जोरदार बॅटिंग; पहिल्या दिवसाचा खेळ संपवला

Ind vs Ban Day-1 । India vs Bangladesh : भारत – बांगलादेश दरम्यान शुक्रवारपासून सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाने धुंवाधार फलंदाजी केली. त्यामुळे दिवसभरात केवळ ३५ षटकांचा खेळ होऊ शकला.
यामध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजाना झटपट बाद करण्यात यश मिळविले. वेगवान गोलंदाज आकाशदीपने २ तर अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने एक गडी बाद केला. ३५ व्या षटकांत पुन्हा पावसाने हजेरी लावल्यानंतर दोन्ही पंचानी आजचा खेळ संपल्याची घोषणा केली.
कर्णधार रोहित शर्माने पहिल्या कसोटीमध्ये असलेलाच संघ कायम ठेवला. या संघात कोणताही बदल केला नाही. भारताने मायदेशात खेळताना तब्बल ९ वर्षांनंतर १४ व्या लढतीमध्ये नाणेफेक जिंकूनही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कानपूरमध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध कर्णधार विराट कोहलीने २०१५ साली भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ती कसोटी अनिर्णित राहिली होती. त्यानंतर थेट २०२४ साली कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीचा निर्णय घेतला. आज ढगाळ वातावरण असल्याने हा निर्णय घेतल्याचे रोहित शर्माने बोलताना सांगितले.
पावसामुळे नाणेफेक देखील जवळपास एक तास उशीरा झाली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना फलंदाजीसाठी पाचारण केले. रोहित शर्माने पाहुण्यांना फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिले, हीच गोष्ट भारताच्या वेगवान गोलांदाजाच्या फायदेशीर ठरली.
एका बाजूने बुमराहने तर दुसऱ्या बाजूने सिराजने गोलंदाजीला सुरुवात केली. दोन्ही गोलंदाजानी बांगलादेशच्या फलंदाजांना जखडून ठेवले. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र बुमराह आणि सिराजने बांगलादेशच्या दोन्ही फलंदाजांना एकदाही हात मोकळे करण्याची संधी दिली नाही.
नवव्या षटकांत आकाशदीप…
बुमराह व सिराजला अपेक्षित यश न मिळाल्याने भारताचा कर्णधार रोहित शर्माने चेंडू आकाशदीप कडे सोपविला. आकाशदीपने पहिलाच चेंडू १३३ किमीच्या वेगाने फुललेंथवर टाकला. यावेळी बांगलादेशचा सलामीवीर झाकीर हसनने तो चेंडू ड्राइव्हकरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आकाश दीपच्या दुसऱ्या चेंडूला झाकीरने कव्हरमध्ये ढकलले.
त्यानंतर आकाशदीपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेळण्यासाठी सरसावलेल्या झाकीरच्या बॅटची कड घेऊन चेंडू थेट तिसऱ्या स्लीपमध्ये असलेल्या यशस्वी जैस्वालकडे गेला. यशस्वीने अविश्वसनीय झेल पकडून भारताचे बळींचे खाते उघडले. झाकीरने २४ चेंडूचा सामना करून देखील त्याला खातेही उघडता आले नाही.
डीआरएसने मिळवून दिला दुसरा बळी
दुसरा सलामीवीर शादमान इस्लाम चांगलाच स्थिरावत होता. त्याने ३६ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने २४ धावा केल्या होत्या. आकाशदीपच्या तिसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू थेट शादमानच्या पॅडवर आदळला. आकाशदीपने जोरदार अपील मात्र पंचानी त्याला दाद दिली नाही. तरी देखील आकाशदीपला शादमान बाद असल्याची खात्री होती.
यावेळी त्याने कर्णधार रोहित शर्माकडे पाचारण केले. रोहित शर्मा, यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि आकाशदीप यांनी शेवटचे तीन सेकंद बाकी असताना डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी शादमान इस्लाम बाद असल्याचे दिसत होते. यानंतर पंचानी शादमान इस्लामला बाद ठरविल्याने भारताला दुसरा बळी मिळाला.
मोमिनुल – शांतोची अर्धशतकी भागीदारी
बांगलादेश २ बाद २९ असा अडचणीत सापडला असताना मोमिनुल हक आणि नजमुल हुसेन शांतो यांची जोडी जमली. मोमिनुल हक आणि नजमुल हुसेन शांतो यांनी भारताच्या गोलंदाजाना दमवायला सुरुवात केली. दोघांचाही स्ट्राइक रेट ५० पेक्षाही खाली गेला होता.
दोघांनीही चांगल्या चेंडूंना सोडून देत होते. खराब चेंडूंवर धावा देखील वसूल करत होते. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १०१ चेंडूत ५१ धावांची भागीदारी केली. यामध्ये शांतोचा ३१ धावांचा तर मोमिनुलचा १९ धावांचा वाटा होता.
रविचंद्रन अश्विन
पहिल्या कसोटीमध्ये शतकी खेळी करून सहा गडी बाद करणाऱ्या रविचंद्रन अश्विनने कर्णधार नजमुल हुसेन शांतोचा अडसर दूर केला. अश्विनने शांतोला यष्टीसमोर पकडले. शांतोने ५७ चेंडूत ६ चौकारांसह ३१ धावांची खेळी केली. यानंतर मुशफिकूर रहीम फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्याने खेळ थांबावावा लागला. यावेळी दोन्ही पंचानी दिवसभराचा खेळ संपल्याचे जाहीर केले.
संक्षिप्त धावफलक :
बांगलादेश : पहिला डाव : ३५ षटकांत ३ बाद १०७ : झाकीर हसन ०, शादमान इस्लाम २४ (३६ चेंडू, ४ चौकार), मोमिनुल हक नाबाद ४० (८१ चेंडू, ७ चौकार), नजमूल हुसेन शांतो ३१ (५७ चेंडू, ६ चौकार), मुशफिकूर रहीम नाबाद ६ (१३ चेंडू, १ चौकार), आकाशदीप १०-४-३४-२, रविचंद्रन अश्विन ९-०-२२-१, मोहम्मद सिराज ७-०-२७-०, जसप्रीत बुमराह ९-४-१९-०
गडी बाद होण्याचा क्रम : १-२६ (झाकीर हसन), २-२९ (शादमान इस्लाम), ३-८० (नजमूल हुसेन शांतो).





