IND vs BAN 2nd Test : रविचंद्रन अश्विनने केला नवा विश्वविक्रम, ‘या’ बाबतीत मुरलीधरनची केली बरोबरी..

IND vs BAN 2nd Test (Ravichandran Ashwin) : टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत बांगलादेशसोबत खेळलेली कसोटी मालिका जिंकली आहे. रविचंद्रन अश्विनला या मालिकेतील शानदार कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार जिंकून अश्विनने माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरनच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार…
भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत रविचंद्रन अश्विनने अप्रतिम खेळ दाखवला. त्याने बॅट आणि बॉल दोन्हीने योगदान दिले. या विजयी कामगिरीसाठी अश्विनला ‘प्लेयर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार देण्यात आला. अश्विनचा हा 11वा मालिकावीर (प्लेयर ऑफ द सिरीज) पुरस्कार ठरला. यासह अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘मॅन ऑफ द सीरीज’ पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत, त्याने माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरनची बरोबरी केली आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत 11 मालिकावीर पुरस्कार जिंकले आहेत.
आर अश्विनने 42 कसोटी मालिकेत 11 वेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळवला आहे. तर मुथय्या मुरलीधरने 61 मालिका खेळल्यानंतर 11 व्यांदा हा पुरस्कार मिळवला होता. जॅक कॅलिस, शेन वॉर्न, इम्रान खान आणि रिचर्ड हॅडली यांनी प्रत्येकी 8 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. भारताचा पुढची कसोटी मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आर अश्विनच्या कामगिरीकडे लक्ष असेल कारण या मालिकेत त्यानं मालिकावीराचा पुरस्कार मिळवला तर तो अव्वल स्थानी विराजमान होईल.
Most Player-of-the-Series awards in Test cricket
Muthiah Muralidaran – 11
R Ashwin – 𝟭𝟭#INDvBAN pic.twitter.com/TqIqhLjz6K— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 1, 2024
मालिकेतील अश्विनची कामगिरी…
भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत, रविचंद्रन अश्विनने 2 सामन्यांच्या 4 डावात 19.27 च्या सरासरीने 11 बळी घेतले. याशिवाय चेन्नई कसोटीत त्याने अप्रतिम शतक झळकावले. त्याने 2 सामन्यात 57.00 च्या सरासरीने एकूण 114 धावा केल्या.
अश्विनची कारकिर्द…
रविचंद्रन अश्विन गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी कसोटीत सातत्यपूर्ण सामना जिंकणारी कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत 102 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 23.65 च्या सरासरीने 527 विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत त्याने 25 वेळा 4 बळी, 37 वेळा 5 बळी आणि 8 वेळा 10 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर बॅटसह त्याची कामगिरी अप्रतिम अशी राहिली आहे. त्याने 26.74 च्या सरासरीने 3 हजार 423 धावा केल्या आहेत. या काळात अश्विनने 6 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत.





