IND vs BAN 2nd Test (4th Day,Stumps) : टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, एकाच डावात केले 5 मोठे विक्रम….

IND vs BAN 2nd Test (4th Day,Stumps ) : पावसानंतर चौथ्या दिवशी खेळाला सुरुवात झाल्यानंतर आज मैदानात बळींचा पाऊस पडला. बांगलादेश संघाने 3 बाद 107 पासून पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांत संपुष्टात आला.
भारताने झटपट आघाडी घेण्यासाठी आक्रमक पद्धतीने खेळ करत पहिला डाव 34.4 षटकात 9 बाद 285 धावसंख्येवर घोषित केला आणि पहिल्या डावात 52 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर बांगलादेशने 2 गडी गमावून 26 धावा केल्या आहेत. लढतीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचे पहिल्या डावातील 7, भारताचे 9 तर बांगलादेशचे दुसऱ्या डावातील 2 असे तब्बल 18 फलंदाज बाद झाले आहेत, हेच चौथ्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल अशाप्रकारे चौथ्या दिवसाचा खेळ अतिशय रोमांचक झाला. एकूण 18 विकेट पडल्याच त्याबरोबर कसोटी क्रिकेटमधील 5 मोठे विक्रम झाले.
कसोटी सामन्याला फारच कमी वेळ शिल्लक आहे. भारतासाठी जिंकणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणून जेव्हा भारतीय संघ फलंदाजीला आला तेव्हा संघ अनिर्णित राहण्याऐवजी विजयासाठी गेला आणि रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी टी20 शैलीत फलंदाजीस सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी भारताने अवघ्या 3.5 षटकांत 55 धावा जोडल्या. रोहित 11 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. पण धावा करण्याची गती कमी झाली नाही.
भारताने केवळ 34.4 षटकात 9 विकेट गमावत 285 धावा करून डाव घोषित केला. पहिल्या डावाच्या आधारे भारताला 52 धावांची आघाडी मिळाली आहे. भारताकडून जैस्वालने 72, केएल राहुलने 68, विराट कोहलीने 47 आणि गिलने 39 धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन आणि शकिब अल हसन यांनी 4-4 विकेट घेतल्या. हसन महमूदला 1 बळी मिळाला.
भारताने केले 5 विक्रम
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील 5 मोठे विक्रम केले. कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वात जलद 50, 100, 150, 200 आणि 250 धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. भारताने 3 षटकांत 50 धावा, 10.1 षटकांत 100 धावा, 18.2 षटकांत 150 धावा, 24.2 षटकांत 200 धावा व 30.1 षटकांत 250 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील हा एक विक्रम आहे.
Fastest 50 in Tests – 3 overs.
Fastest 100 in Tests – 10.1 overs.
Fastest 150 in Tests – 18.2 overs.
Fastest 200 in Tests – 24.2 overs
Fastest 250 in Tests – 30.1 overs.ALL ACHIEVED BY INDIA IN A SINGLE DAY, HATS OFF BOYS…!!! 🙇♂️🇮🇳 pic.twitter.com/oCg2TGMFCc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
कोहलीने मोडला तेंडुलकरचा विक्रम….
सोमवारी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध भारताच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी विराट कोहली सर्वात जलद 27,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला. त्याने सचिन तेंडुलकरचा 623 डावात 27,000 धावा करण्याचा विक्रम मागे टाकला. कोहलीने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 594 डाव खेळले आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी कोहलीने 114 सामन्यांमध्ये 48.74 च्या सरासरीने 8871 कसोटी धावा, 295 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.18 च्या सरासरीने 13906 धावा तर 125 टी-20 सामन्यांमध्ये 48.69 च्या सरासरीने 4188 धावा केल्या आहेत.
वेगवान 27 हजार धावांचा टप्पा ओलांडणारे खेळाडू
विराट कोहली : भारत : 594
सचिन तेंडुलकर : भारत : 623
कुमार संगाकारा : श्रीलंका : 648
रिकी पॉन्टिंग : ऑस्ट्रेलिया : 650
जडेजाचे 300 बळी
दुसऱ्या लढतीच्या चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाने खालेद अहमदला बाद करून कसोटीमध्ये 300 बळींचा टप्पा पार केला. 300 बळी व 3 हजारपेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला डावखुरा भारतीय खेळाडू ठरला. त्याने 73 कसोटी लढतीमध्ये ही कामगिरी करून दाखविली. त्याबरोबरीने वेगवान 300 बळी घेणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अश्विनने 54, अनिल कुंबळेने 66 तर हरभजन सिंगने 72 कसोटीमध्ये हा टप्पा पार केला होता.





