IND vs BAN 1st T20 : नव्या दमाच्या खेळाडूंना मिळणार संधी, बांगलादेशविरूध्दच्या पहिल्या टी-20साठी Team India सज्ज…

India vs Bangladesh T20 Series : – आजपासून(रविवार,दि.06) भारत – बांगलादेश टी-20 मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याने या मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळेच वेगवान गोलंदाज मयांक यादव, हर्षित राणा व अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी हे या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे.
बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाची नजर आता टी-20 मालिकेवर आहे. आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे. या दोघांमधील पहिला सामना आज ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल, ज्यामध्ये भारतीय संघ विजयासह 1-0 अशी आघाडी घेण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.
मयांक यादवला संधी
मागील आयपीएलच्या हंगामामध्ये मयांक यादवने 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र बारगड्यामध्ये ताण आल्याने त्याला स्पर्धा अर्धवट सोडावी लागली होती. मयांकला प्रथमच या टी-20 मालिकेसाठी त्याला संधी मिळाली आहे. त्यामुळे या मालिकेतून मयांकची क्षमता, फॉर्म आणि तंदुरुस्ती या तीनही गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे. कोणत्याही खेळाडूला राष्ट्रीय संघात सामावून घेण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागते. मात्र 22 वर्षीय या वेगवान गोलंदाजाला त्याच्या खास शैलीमुळे त्याला संघात स्थान मिळाले आहे. त्याने आयपीएलमध्ये ज्या अचूकतेने आणि नियंत्रणाने गोलंदाजी केली होती, त्याच प्रकारे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील गोलंदाजी करण्याची क्षमता आहे का ? हेच याच मालिकेतून तपासण्यात येणार आहे. मयांकच्या बरोबरीने दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार यांनाही बांग्लादेशविरुद्धच्या या मालिकेत भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
नव्या दमाचे खेळाडू…
या टी-20 मालिकेनंतर न्यूझीलंड सोबत कसोटी मालिका भारतीय संघ खेळणार आहे. यासाठी शुबमन गिल, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. सध्या कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या ही दोन मोठी नावे संघात समाविष्ट आहेत. याबरोबरीने शिवम दुबे आणि अर्शदीप सिंह यांचाही समावेश संघात करण्यात आला आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन या खेळाडूंना देखील चांगली संधी आहे. रियाग परागने यापूर्वी 6 लढतीत देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, त्या संधीचे त्याला सोने करता आले नाही. फिरकीपटू वरून चक्रवर्ती व रवी बिष्णोई या खेळाडूंना देखील या मालिकेत संधी मिळाली आहे.
Gwalior ready 👌👌
All set for the #INDvBAN T20I series opener 🙌#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/OTyBBavPFD
— BCCI (@BCCI) October 6, 2024
शाकिबनंतरचा बंगालादेश संघ
शाकिबने निवृत्ती जाहीर केल्यानंतर बांगलादेशचा संघ प्रथमच टी-20 मालिका खेळणार आहे. शाकिब गेल्या दशकभरात बांगलादेश संघाचा महत्वाचा आधार बनला होता. शाकिबच्या निवृत्तीने बांगलादेश संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बांगलादेशचा फिरकीपटू मेहदी हसनला तब्बल १४ महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा संघात स्थान मिळाले आहे. याचबरोबरीने अनुभवी फलंदाज महमूद उल्लाह देखील या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असणार आहे.
14 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना
ग्वाल्हेर शहराच्या सीमेवर असलेल्या श्रीमंत माधवराव सिंधिया मैदानामध्ये आजचा सामाना रंगणार आहे. मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेने या सामन्याची जोरदार तयारी केली आहे. कॅप्टन रूपसिंग स्टेडियमने 2010 मध्ये ग्वाल्हेरचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला होता जेव्हा सचिन तेंडुलकरने प्रसिद्ध द्विशतक ठोकले होते. त्यानंतर गेल्या 14 वर्षात येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना घेण्यात आला नव्हता.
Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियाला मिळणार पहिला विजय! पाकनं दिलं माफक धावांचे लक्ष्य…
दोन्ही संघ खालीलप्रमाणे :
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, महमूद उल्लाह, लिटन दास, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराझ, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान. , तनझिम हसन साकिब , रकीबुल हसन.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.





