IND vs AUS ODI Series Updates : भारतीय क्रिकेट संघ 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सज्ज होत आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा अद्याप बाकी असून, समाचार एजन्सी पीटीआयच्या वृत्तानुसार, उद्या (4 ऑक्टोबर) रोजी संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या वनडे मालिकेतील सहभागाबाबत चर्चा सुरू असून, त्यांचा पर्थ येथे 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी संघात समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. विराट-रोहित यांनी मार्च 2025 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. गेल्या सात महिन्यांत त्यांनी कठोर मेहनत घेतली असून, दोघांनीही कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते फक्त वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत. 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भविष्याबाबतही बीसीसीआयशी चर्चा होणार आहे. बीसीसीआय सूत्रांनुसार, या हंगामात भारतीय संघाला फक्त सहा वनडे सामने खेळायचे आहेत. तीन ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि तीन न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर. त्यामुळे रोहित आणि कोहली यांच्याबाबत कोणताही घाईघाईने निर्णय घेतला जाणार नाही. गिल आणि बुमराह यांना विश्रांती? सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दुसरा कसोटी सामना 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका सुरू होईल. यामुळे शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांच्या कामाच्या ताणाचा विचार करून त्यांना या दौऱ्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच, आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झालेले अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या दौऱ्यासाठी उपलब्ध नसतील. त्यांच्या जागी नीतीश कुमार रेड्डीला संधी मिळण्याची शक्यता आहे. हेही वाचा – ENG W vs SA W : दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडविरुद्ध १० विकेट्सनी दारुण पराभव, गेल्या २० वर्षांत प्रथमच घडलं असं ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक – भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे सामन्यांव्यतिरिक्त पाच सामन्यांची टी-20 मालिकाही खेळली जाईल. क्रिकेट चाहत्यांच्या नजरा रोहित आणि कोहली यांच्या पुनरागमनावर तसेच नव्या खेळाडूंना मिळणाऱ्या संधीवर केंद्रित आहेत.