IND vs AUS 2nd Test : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांकडे त्याच्या वेग आणि स्विंगला उत्तर नव्हते. पर्थ कसोटीत बुमराहने 8 विकेट घेतल्या आणि तो सामनावीर ठरला. त्याचवेळी आता सर्वांच्या नजरा ॲडलेड कसोटी सामन्यावर खिळल्या आहेत. जसप्रीत बुमराह त्याचा जबरदस्त फॉर्म कायम ठेवेल अशी चाहत्यांना आशा आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहला ॲडलेड कसोटी सामन्यात मोठी कामगिरी करण्याची संधी आहे.
‘या’ बाबतीत झहीर खानला सोडू शकतो मागे….
बुमराहने ॲडलेड कसोटी सामन्यात एक विकेट घेतल्यास तो यावर्षी एका कॅलेंडर वर्षात 50 कसोटी बळी घेईल. त्याच वेळी, त्याने तीन विकेट घेतल्यास, तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत झहीर खानला मागे सोडेल. झहीर खानने 2002 मध्ये एका कॅलेंडर वर्षात 51 कसोटी विकेट घेतल्या होत्या. बुमराहने यावर्षी 10 कसोटी सामन्यांमध्ये 49 विकेट घेतल्या आहेत.
कपिल देव यांच्या नावावर आहे रेकॉर्ड
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर आहे. कपिल देव यांनी 1983 मध्ये 75 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्याने 1979 मध्ये 74 विकेट्सही घेतल्या होत्या. कपिल देव नंतर झहीर खान हा एका कॅलेंडर वर्षात 50 बळी घेणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाजीमध्ये अनिल कुंबळेने एका कॅलेंडर वर्षात 74 विकेट्स घेतल्या आहेत. अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने 2016 मध्ये 72 विकेट घेतल्या होत्या. फिरकीपटूंमध्ये रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंग, भागवत चंद्रशेखर आणि विनू मांकड यांनीही कॅलेंडर वर्षात 50 हून अधिक बळी घेतले आहेत.
कुंबळेचा विक्रम निशाण्यावर….
जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने अश्विनला मागे टाकले आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियात 40 तर अश्विनने 39 विकेट घेतल्या आहेत. कपिल देवने 51 विकेट्स तर कुंबळेने ऑस्ट्रेलियात 49 विकेट्स घेतल्या आहेत.