IND vs AUS 4th Test : बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात बुमराहचा मोठा पराक्रम, गाठला आणखी एक खास टप्पा…

Jasprit Bumrah big achievement : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 6 विकेट गमावून 311 धावा केल्या आहेत. भारताकडून पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक विकेट घेतल्या. आतापर्यंत त्याने 21 षटकात 75 धावा देऊन 3 बळी घेतले आहेत. या काळात त्याने एक मोठा पराक्रम केला आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहची सुरुवात काही खास नव्हती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टासने त्यांच्याविरुद्ध वेगवान धावा केल्या. मात्र तो बाद झाल्यानंतर जसप्रीत बुमराहने पुन्हा लय मिळवली. दुसऱ्या सत्रात उस्मान ख्वाजा (57) याला बाद करून त्याने पहिली विकेट घेतली. यानंतर त्याने ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्शला सलग दोन षटकांत बाद केले.
That’s Stumps on Day 1
Australia reach 311/6 with Jasprit Bumrah leading the way with 3️⃣ wickets
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/8CPfzzk1gH
— BCCI (@BCCI) December 26, 2024
या मालिकेत आतापर्यंत जबरदस्त फॉर्मात असलेला हेड भोपळाही फोडू शकला नाही. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श 13 चेंडूत केवळ 4 धावा करू शकला. मार्शची विकेट घेऊन बुमराह भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे.
इशांत शर्माला सोडलं मागे….
मार्शच्या विकेटसह बुमराहच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बळींची संख्या 435 वर पोहोचली आहे. त्याने इशांत शर्माचा 434 बळींचा विक्रम मागे टाकला आहे. इशांतने नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्याच्या नावावर कसोटी, एकदिवसीय आणि T20 मध्ये अनुक्रमे 311, 115 आणि 8 विकेट आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स (वेगवान गोलंदाज)
1. कपिल देव : 687
2. जहीर खान : 597
3. जवागल श्रीनाथ : 551
4. मोहम्मद शमी : 448
5. जसप्रीत बुमराह : 435
6. इशांत शर्मा : 434
बुमराहने कसोटीत 197, वनडेत 149 आणि टी-20 मध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत बुमराह आता फक्त कपिल (687), झहीर खान (597), जवागल श्रीनाथ (551) आणि मोहम्मद शमी (448) यांच्या मागे आहे.





