IND vs AUS 4th Test : मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा दारूण पराभव, कांगारूंनी 184 धावांच्या विजयासह मालिकेत घेतली आघाडी….

IND vs AUS 4th Test Match Result : मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी खेळली गेली. उभय संघांमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ही चौथी कसोटी होती. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव पाचव्या दिवशी 234 धावांवर आटोपला. आघाडीसह ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 339 धावांची झाली आणि भारताला 340 धावांचे लक्ष्य मिळाले, पण प्रत्युत्तरात टीम इंडिया 155 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाला हा सामना ना जिंकता आला ना तो अनिर्णित करता आला आणि बॉक्सिंग डे कसोटी कांगारूंनी 184 धावांनी जिंकली. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कायम ठेवण्यासाठी भारताला पुढील कसोटी जिंकावी लागणार आहे. मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिल्यास भारत ट्रॉफी कायम राखेल.
#TeamIndia fought hard
Australia win the match
Scorecard ▶️ https://t.co/njfhCncRdL#AUSvIND pic.twitter.com/n0W1symPkM
— BCCI (@BCCI) December 30, 2024
दुसऱ्या डावातही रोहित-कोहली फेल….
दुसऱ्या डावात भारताच्या 9 फलंदाजांना धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही पार करता आला नाही. केवळ यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावले. त्याने 208 चेंडूत 84 धावांची तर ऋषभ पंतने 104 चेंडूत 30 धावांची खेळी केली. बाकीचे फलंदाज अपयशी ठरले. रोहित शर्मा केवळ 9 धावा, केएल राहुल 0, विराट कोहली 5, रवींद्र जडेजा 2, नितीश कुमार रेड्डी केवळ 1 धाव करू शकले. आकाश दीपने 7 तर जसप्रीत बुमराह आणि सिराजला खातेही उघडता आले नाही. वॉशिंग्टन सुंदर 5 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात गोलंदाजीत कर्णधार कमिन्सने 3, स्कॉट बोलंडने 3, नॅथन लियॉनने 2, स्टार्क आणि हेडने प्रत्येकी 1 बळी घेतला.
IND vs AUS 4th Test : पहिला दिवस यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर, चार फलंदाजांनी झळकावली अर्धशतके…
13 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये भारताचा पराभव….
टीम इंडियाला चौथ्या डावात अन् पाचव्या दिवशी विजयासाठी 92 षटकात 340 धावांचे लक्ष्य मिळालं होते, मात्र टीम इंडियाला तीन सत्रेही खेळता आली नाहीत आणि 11 फलंदाज 155 धावांतच पॅव्हेलियनमध्ये परतले. 13 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा हा कसोटी पराभव आहे. यापूर्वी 2011 मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांनंतर पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता पाचवी आणि शेवटची कसोटी 3 जानेवारीपासून सिडनीत खेळवली जाणार आहे.
कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पोहोचण्याच्या आशांना धक्का….
या पराभवामुळे भारताच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पोहोचण्याच्या आशांनाही मोठा धक्का बसला आहे. आता संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. तसेच सिडनीतील पुढील कसोटी काहीही करून जिंकणे गरजेचे असेल. अनिर्णित किंवा पराभवामुळे टीम इंडिया WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर होईल. सिडनी कसोटी जिंकण्यासोबत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंका मायदेशात ऑस्ट्रेलियाला 2-0 ने पराभूत करेल अशी प्रार्थना करावी लागेल.
दरम्यान, सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव केला आणि या विजयासह आफ्रिकेच्या संघानं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC Final 2025) अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत (ICC World Test Championship 2023-2025) पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.





