IND vs AUS 4th Test : पहिला दिवस यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर, चार फलंदाजांनी झळकावली अर्धशतके…

IND vs AUS 4th Test (Day 1 Stumps) : मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा चौथा कसोटी सामना आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पुढील दोन कसोटी दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या आहेत.
चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात 19 वर्षांच्या सॅम कॉन्स्टासने पदार्पण केले आणि आपल्या दमदार खेळाने सर्वाचेच लक्ष्य वेधले. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. खेळ थांबला तेव्हा स्टीव्ह स्मिथ 68 धावांवर आणि पॅट कमिन्स 08 धावांवर नाबाद परतले.
That’s Stumps on Day 1
Australia reach 311/6 with Jasprit Bumrah leading the way with 3️⃣ wickets
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/8CPfzzk1gH
— BCCI (@BCCI) December 26, 2024
मेलबर्नमध्ये भारताने दोन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला, पण कर्णधार रोहितचा हा निर्णय अद्यापतरी योग्य ठरला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 311 धावा केल्या होत्या. सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी पहिल्या दिवशी अर्धशतके झळकावली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला ख्वाजा आणि कॉन्स्टन्सने शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. कॉन्स्टस 65 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 2 षटकार आले. विशेष बाब म्हणजे या युवा फलंदाजाने जसप्रीत बुमराहवर रॅम्प शॉट्स खेळले आणि अनेक चौकार मारले. या कारणामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे. कॉन्स्टसला रवींद्र जडेजाने बाद केले.
दुसऱ्या विकेटसाठीही अर्धशतकी भागीदारी झाली. दुसरी विकेट ख्वाजाच्या रूपाने पडली. 121 चेंडूत 57 धावा करून तो बाद झाला. त्याच्या बॅटमधून 6 चौकार आले. बुमराहने ख्वाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मग स्मिथ आणि लॅबुशेन या दोघांनी 83 धावांची भागीदारी केली.
लॅबुशेन 145 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 72 धावा करून बाद झाला. सुंदरने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श स्वस्तात बाद झाले. हेड शून्यावर तर मार्श 04 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर मात्र, 2 बाद 237 धावसंख्येवरून यजमान संघाची स्थिती 5 बाद 246 धावा अशी झाली.
यानंतर ॲलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, कॅरी 41 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. आकाशदीपने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट 299 धावांवर पडली. यानंतर कमिन्स आणि स्मिथने डावाची धुरा संभाळली आणि खेळ थांबेपर्यत एकही विकेट पडू दिली नाही. भारताकडून बुमराहने 3 बळी घेतले. याशिवाय रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीप यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.





