IND vs AUS 1st Test : बहुप्रतीक्षीत Border-Gavaskar Trophy चा थरार आजपासून रंगणार; WTC दृष्टीने दोन्ही संघांसाठी मालिका महत्वाची….

Border-Gavaskar Trophy 2024/25 (IND vs AUS) : – आज शुक्रवारपासून बहुप्रतीक्षीत बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडकडून मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत झालेला भारतीय संघ प्रचंड दडपणाखाली पर्थ येथून सुरु होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका फलंदाजाच्या हाराकीरीने पराभूत व्हावी लागली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील उसळत्या खेळपट्टीवर देखील भारतीय फलंदाजासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे भारताची फलंदाजी बहरते की कोसळते यावर या मालिकेचा निकाल अवलंबून असणार आहे. ही पाच कसोटी सामन्यांची मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे कारण यापैकी एक संघ मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship 2023-2025) अंतिम फेरीत प्रवेश करेल.
सामना : भारत वि ऑस्ट्रेलिया
दिवस : पहिला
स्थळ : पर्थ स्टेडियम, पर्थ, ऑस्ट्रेलिया
वेळ : सकाळी ७.५० पासून
भारताने २०१८-१९ व २०२०-२१ दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया केली होती. मात्र न्यूझीलंडने भारताला ३-० असे पराभूत केल्याने भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य खचले असण्याची चिंता आहे. त्यातूनच भारताचे आघाडीच्या फळीतील काही फलंदाज हे कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. या मालिकेमधूनच त्याची पुढील वाटचाल ठरणार आहे.
न्यूझीलंड मालिकेपूर्वी भारत विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत विक्रमी तिसऱ्यांदा प्रवेश करेल असे वाटत होते. मात्र सलग तीन पराभवामुळे अंतिम फेरीची वाटचाल भारतासाठी कठीण झाली आहे. विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला ४-० असे पराभूत करावे लागणार आहे. असे असले तरीही, भारतीय संघाची क्षमता माहिती असणाऱ्यांना भारतीय संघ कशा प्रकारे पुनरागमन करू शकतो, याची पूर्ण कल्पना आहे. संघाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर प्रत्येक वेळेस संघांने आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखविली आहे.
मुख्य खेळाडू अजूनही बाहेर…
गतवेळी भारताने ऑस्ट्रेलियाला सहज नमविले होते. त्यामुळे झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज असणार आहे. मात्र पाहिल्याचं लढतीमध्ये भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, रिव्हर्स स्विंगचा बादशाह मोहम्मद शमी, पांढऱ्या चेंडूचा उपकर्णधार शुभमन गिल हे पहिल्या लढतीत मैदानात उतरणार नाहीत. रोहित शर्मा दुसऱ्यांदा पिता झाल्याने तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसणार आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे शमीची निवड या मालिकेसाठी करण्यात आलेली नाही. हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याने शुभमन गिल देखील पहिल्या लढतीसाठी उपलब्द असेल याबाबत साशंकता आहे.
ऑस्ट्रेलियाचा दौरा – कारकीर्द घडविणारा
आशियाई देशांसाठी, ऑस्ट्रेलिया दौरा हा सर्वार्थाने महत्वाचा असतो. क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरने वाकाच्या खेळपट्टीवर मोठमोठे तडे जाऊन देखील शतकी खेळी केली होती. मात्र १९९१-९२ च्या दौऱ्यानंतर दिलीप वेंगसरकर व के. श्रीकांत यांना निरोप द्यावा लागला होता. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असणारे रोहित शर्मा, विराट कोहली व रविचंद्रन अश्विन यांच्यासाठी हा दौरा अतिशय महत्वाचा असणार आहे. या मालिकेतील खराब कामगिरी त्यांना महागात पडू शकते. २०१४ मध्ये कोहलीने चार शतके झळकावली व तो ‘किंग’ झाला. चेतेश्वर पुजारा व यष्टिरक्षक ऋषभ पंत यांनी धडाकेबाज खेळी करताना कांगारूंच्या गोलंदाजांची झोप उडविली होती.
गोलंदाजांचा वरचष्मा असणारी मालिका
कोणताही गोलंदाजाला अपेक्षित असणाऱ्या खेळपट्ट्या ऑस्ट्रेलियामध्ये सज्ज असणार आहेत. भारतीय गोलंदाजाना ही एक चांगली संधी असणार आहे. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी असणारा जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. त्याच्या साथीला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज व आकाश दीप हे देखील असणार आहेत. याचबरोबरीने उंचपुरा प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांची देखील पहिल्या कसोटीसाठी निवड होऊ शकते. यांच्याकडे अनुभवाची कमतरता असली तरी देखील ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज यांना हलक्यात घेणार नाहीत, हे वास्तव आहे.
ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी
सध्या सुरु असलेल्या विश्व कसोटी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथची सरासरी केवळ ३६च्या आसपास आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याची सरासरी ५६ पेक्षा जास्त आहे. मार्नस लॅबुशेनची सरासरी देखील ५० वरून घसरून ३० च्या आसपास आली आहे. ट्रॅव्हिस हेडने भारतासाठी नेहमीच आव्हान उभे केले होते, मात्र यावेळी तो देखील केवळ २८ च्या सरासरीने धावा करत आहे. उस्मान ख्वाजा वगळाता ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नाही. यष्टिरक्षक ॲलेक्स केरी आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी काही वेळा चांगली खेळी करून प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणले आहे.
“जिंकल्यानंतर किंवा पराभूत झाल्यानंतर तुम्ही पुन्हा शून्यापासून सुरुवात करता. आम्ही भारतातून येताना कोणताही दबाव घेऊन मैदानात उतरणार नाही. न्यूझीलंड मालिकेतून आम्ही धडा घेतला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील परिस्थिती वेगळी आहे, आणि येथे निकाल देखील वेगळा असणार आहे.”
– जसप्रीत बुमराह (हंगामी कर्णधार, भारतीय संघ)
कोण मिळवू शकते संघात स्थान ?
पर्थची खेळपट्टीतील ओलावा आणि उसळी लक्षात घेता, अष्टपैलू रवींद्र जडेजा ऐवजी रविचंद्रन अश्विनला संधी मिळू शकते. अष्टपैलू नितीशकुमार रेडडीला देखील संधी मिळून तो चौथ्या गोलंदाजाची भूमिका निभावू शकतो. या प्रमाणे तो खालच्या फळीत फलंदाजी देखील करू शकतो. फलंदाजीत भारताकडे अव्वल सहा फलंदाज आहेत. मात्र, त्यापैकी तिघांना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव नाही. दोघांना केवळ चार कसोटींचा अनुभव आहे. त्यामुळे ऋषभ पंत व लोकेश राहुल यांच्याकडून सर्वाधिक अपेक्षा असणार आहेत. याचबरोबरीने यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडीक्कल व ध्रुव जुरेल हे आत्मविश्वासाच्या जोरावर संघात खेळू शकतील.
भारतीय संघ : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिकल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, आकाश दीप, हर्षित राणा, प्रसिध्द कृष्णा, अभिमान इसवरन, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.
बॉर्डर-गावस्कर ट्राफीबदल….
१- १९९६-९७ मध्ये पहिला बॉर्डर-गावस्कर करंडक खेळाला गेला. आतापर्यंत १६ वेळेस ही मालिका घेण्यात आली आहे.
२ – १६ मालिकांमध्ये भाराताने १० वेळेस तर ऑस्ट्रेलियाने ५ वेळेस ही मालिका जिंकली आहे. १ मालिका अनिर्णित राहिली आहे.
३- मागील चार वेळेस सलग भारताने मालिकेचे विजेतेपद मिळविले आहे.
४ – या मालिकेतून भारताला विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा असे दमदार खेळाडू गवसले.
५ – आघाडीच्या केवळ तीन फलंदाजाना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव
६ – गोलंदाजीची धुरा बुमराहसह आकाशदीप, सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांच्या खांद्यावर





