Border-Gavaskar Trophy 2024/25 : ऑस्ट्रेलियासाठी ‘हे’ दोन भारतीय खेळाडू ठरलील त्रासदायक, रवी शास्त्रींनी केलं भाकीत…

Border-Gavaskar Trophy 2024/25 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 ही स्पर्धा 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी पर्थमध्ये खेळवली जाणार आहे. भारत आपले विजेतेपद राखण्यासाठी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अव्वल 2 मध्ये आपले स्थान कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन खेळाडूंची नावे सांगितली आहेत.
1. जैस्वालवर शास्त्रींचा विश्वास…
रवी शास्त्रींच्या दोन महत्त्वाच्या भारतीय खेळाडूंपैकी एक म्हणजे फलंदाज यशस्वी जैस्वाल. ते म्हणाले, “यशस्वीकडे मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे. तो असा खेळाडू आहे की, तो टिकून राहिला तर विरोधी गोलंदाजीला उद्ध्वस्त करू शकतो. त्याचे खेळण्याचे तंत्र मजबूत आहे आणि तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये सहजरित्या, संयमानं खेळतो. त्याने याआधी कसोटी मालिकेत सलग दोन द्विशतके झळकावली आहेत, यावरून त्याच्याकडे धावांची भूक आणि क्षमता दोन्ही असल्याचे दिसून येते.”
वास्तविक, यशस्वी जैस्वालने यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करत आपले संघातील स्थान पक्के केले आहे. मालिकेत सलग दोन द्विशतके झळकावून तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
2. अनुभवी बुमराहकडून शास्त्रींना मोठ्या आशा….
रवी शास्त्रींनी जसप्रीत बुमराहचे दुसरे नाव घेतले आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर बुमराह नेहमीच यशस्वी ठरला आहे, तो भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याचे कौतुक करताना शास्त्री म्हणाले की, “बुमराह हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तो कोणत्याही फलंदाजाला त्याच्या लाइन आणि लेन्थने अडचणीत आणू शकतो. त्याच्याकडे अशी गुणवत्ता आहे ज्यामुळे तो सामन्याचे चित्र पालटवू शकतो.”
दरम्यान, बुमराह पहिल्या कसोटीतही संघाची धुरा सांभाळू शकतो, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा आपल्या कौटुंबिक कारणामुळे सध्या भारतात आहे. रोहित दुसऱ्या कसोटीपासून संघात सामील होऊ शकतो.
Photos : भारत की ऑस्ट्रेलिया..! जाणून घ्या, कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा खरा किंग…?
बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, रवींद्र जड़ेजा, यशस्वी जयसवाल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), सरफराज खान, विराट कोहली, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, वाशिंगटन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
पर्थ कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.





