IND vs AUS 1st Test : जैस्वालकडे एक वेगळा दृष्टीकोन आहे – सुनील गावस्कर

पर्थ – भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने लोकेश राहुल सोबत १७२ धावांची भागीदारी करताना भारताला बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या पहिल्या लढतीत सुस्थितीत आणले. जैस्वाल आणि राहुल यांनी खेळपट्टीवर टिकून राहताना, ऑस्ट्रेलियाच्या त्रिकुटाचा यशस्वी सामना केला. यामध्ये यशस्वी जैस्वालने धडाकेबाज खेळी करताना दुसऱ्या डावात नाबाद ९० धावांपर्यंत मजल मारली. आजच्या खेळीने जैस्वालने सलामीवीरांच्या भूमिकेत खेळाताना एक वेगळा दृष्टिकोन आणला असल्याचे माजी क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावस्कर म्हणाले.
स्टार स्पोर्टसशी बोलताना गावस्कर म्हणाले की, जैस्वालने इंग्लंड विरुद्ध खेळाताना ७०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला दोन द्विशतके केली आहेत. त्यामुळे सलामीवीर म्हणून तो धावांसाठी सातत्याने भूकेला आहे. आमच्या वेळी आम्हाला किमान शतक करा असे सांगण्यात येत असे. मात्र, आता जैस्वाल सारखे फलंदाज शतक करण्यापेक्षा १५० किंवा द्विशतक करण्याच्या गोष्टी करतात. याचीच आज भारतीय क्रिकेटला आवश्यकता असल्याचे गावस्कर म्हणाले.
यशस्वी जैस्वालने यापूर्वी देखील सलामीला खेळताना दमदार कामगिरी केली आहे. तो मुक्तपणे आपले फटके खेळत असतो. याचबरोबरीने एकेरी, दुहेरी धावा देखील तितक्याच लीलया धावतो. त्यामुळे फलंदाजी करताना त्याचा वेगळा दृष्टीकोन ठेवून तो फलंदाजीला उतरतो. गावस्कर म्हणाले, तो, अतिदक्ष असलेल्या फलंदाजानापैकी नाही. मात्र, तो परिस्थितीप्रमाणे फटक्यांची निवड करतो. स्टार्कला आज खेळलेले काही फटके त्याच्यामध्ये असलेला आत्मविश्वास दाखवितात.
तो दडपणाखाली देखील शांत…
पहिल्या डावात यशस्वीने स्टम्पच्या बाहेरच्या चेंडूवर फटके मारताना तो बाद झाला. मात्र, त्याने दुसऱ्या डावात स्वतःला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ दिला. शांतपणे तो चेंडूकडे पाहत होता. जेव्हा चेंडू स्पष्ट दिसू लागला, त्यानंतरच त्याने फटके मारण्यासाठी स्वतःला परवागनी दिली. हे चांगल्या खेळाडूंचे लक्षण आहे, दडपण असल्यावर देखील तो शांत असल्यानेच अशा प्रकारची खेळी करू शकतो, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने जैस्वालच्या शनिवारच्या खेळीचे कौतुक केले.





