Sunil Gavaskar Statement : “सूर्याला आणखी एक सधी द्यायला हवी होती…”, संतप्त सुनील गावस्करांनी निवड समिती आणि BCCI ला सुनावलं
Sunil Gavaskar Statement : सूर्याकडून अशा प्रकारे कर्णधारपद हिरावून घेणे चुकीचे होते, असे स्पष्ट मत गावस्करांनी मांडले आहे.

Sunil Gavaskar Statement On Suryakumar Yadav Sacked India T20I Captaincy : टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला अचानक कर्णधारपदावरून हटवून थेट संघातूनच बाहेर काढण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. सूर्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे. मात्र, बीसीसीआयच्या या धक्कादायक निर्णयावर भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. सूर्याकडून अशा प्रकारे कर्णधारपद हिरावून घेणे चुकीचे होते, असे स्पष्ट मत गावस्करांनी मांडले आहे.
सूर्याला आणखी एक संधी द्यायला हवी होती –
सुनील गावस्कर यांनी निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “२०२८ चा टी-२० विश्वचषक आणि २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अजून दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. आगामी इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून आणखी एक संधी द्यायला हवी होती. त्या मालिकेतील कामगिरी पाहून निवड समितीने वेगळा विचार केला असता, तर ते जास्त योग्य ठरले असते.”
निवड समितीने वय पाहून घेतला निर्णय?
निवड समितीच्या भूमिकेवर बोलताना गावस्कर पुढे म्हणाले, “सिलेक्टर्सनी कदाचित भविष्याचा विचार करून आतापासूनच बदल करायला सुरुवात केली आहे. आपल्याला हे विसरून चालणार नाही की सूर्यकुमार यादवचे वय आता ३५-३६ वर्षे आहे. दोन वर्षांनंतर तो ३८ वर्षांचा होईल. जर २०२८ मध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकायचे असेल आणि विश्वचषक आपल्याकडेच राखायचा असेल, तर एका युवा आणि आंतरराष्ट्रीय कप्तानीचा अनुभव असलेल्या खेळाडूकडे नेतृत्व असायला हवे. श्रेयस अय्यरकडे तो अनुभव नक्कीच आहे.”
सूर्याचा रेकॉर्ड अफलातून, पण अय्यर सरस!
कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड थक्क करणारा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक २०२५ आणि टी-२० विश्वचषक २०२६ जिंकला. सूर्याने ५२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, ज्यापैकी तब्बल ४२ सामन्यांत भारताला विजय मिळवून दिला, तर ८ सामन्यांत पराभव झाला आणि २ सामने टाय राहिले. त्याचा विजयाचा दर तब्बल ८०.७६ टक्के इतका लाजवाब आहे. दुसरीकडे, नवीन कर्णधार श्रेयस अय्यरने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल चॅम्पियन बनवले होते. अय्यरला १०१ आयपीएल सामन्यांमध्ये कप्तानीचा अनुभव असून, त्याने ५५ सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे, तर ४१ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.





